Kolhapur: अंबाबाई मूर्ती पूर्नप्रतिष्ठापनेला ३१० वर्षे पूर्ण, नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत देवस्थान समितीला पडला विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:53 IST2025-09-27T12:53:00+5:302025-09-27T12:53:29+5:30
भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे पूजन

Kolhapur: अंबाबाई मूर्ती पूर्नप्रतिष्ठापनेला ३१० वर्षे पूर्ण, नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत देवस्थान समितीला पडला विसर
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी ३१० वर्षे पूर्ण झाली. याच काळात अंबाबाईचा नवरात्रौत्सव साजरा होत असल्याने पुनर्प्रतिष्ठापनेनिमित्त विशेष कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र सणाच्या धामधुमीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, धर्मशास्त्र अभ्यासक, जिल्हा प्रशासनालाही याचा विसर पडलेला दिसतो.
परकीय आक्रमणांच्या काळात अंबाबाईच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी एका पूजाऱ्याच्या घरी ती लपवून ठेवण्यात आली होती. तरीही देवीचे नित्यनैमित्तिक विधी सुरू होते. महाराणी ताराराणींनी १७१० च्या सुमारास करवीर संस्थानचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यानंतर छत्रपती संभाजी (दुसरे) यांची कारकीर्द सुरू झाली. या दरम्यान नरहरभट सावगांवकर प्रधान यांना दृष्टांत झाला की अंबाबाईची मूर्ती गेली अनेक वर्षे अज्ञातवासात असून तिची पूनर्स्थापना व्हावी. नरहरभटांनी पन्हाळा येथे जाऊन हा दृष्टांत छत्रपतींच्या कानावर घातला.
वाचा: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
छत्रपती संभाजी महाराजांनी आपले विश्वासू सरदार सिदोजीराजे हिंदुराव घोरपडे यांना आदेश देऊन अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करवून घेतली. ही ऐतिहासिक घटना २६ सप्टेंबर या दिवशी घडली. त्यामुळे २६ सप्टेंबर हा दिवस कोल्हापूरच्याइतिहासातील एका सुवर्णपर्वाची सुरुवात म्हणता येईल. या दिवशी सोमवार होता आणि दसरा होता. यंदा ऐन नवरात्रौत्सवात हा ऐतिहासिक दिवस आला आहे. पण त्या धामधुमीत सगळ्यांनाच या विशेष दिवसाचा विसर पडला.
भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे पूजन
या दिवसानिमित्त भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे समितीच्या कार्यालयातील अंबाबाईच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीपूजक शरद मुनीश्वर यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून महापूजा बांधण्यात आली. तर गजेंद्रगडकर घोरपडे घराण्यातील श्रीमंत यशराज घोरपडे व कीर्ती घोरपडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष डाॅ. बी.डी. खणे. उपाध्यक्ष उमाकांत राणिंगा, ॲड. प्रसन्न मालेकर, डाॅ. नीला जोशी, डाॅ. केशव हरेल, भाग्यश्री अध्यापकर. मंगला कट्टी उपस्थित होते.