टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील २,८८२ शाळा उद्या राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:26 IST2025-12-04T12:25:28+5:302025-12-04T12:26:19+5:30
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू नाही

टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील २,८८२ शाळा उद्या राहणार बंद
कोल्हापूर : टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघाच्या वतीने उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून मोर्चा काढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ हजार ८८२ शाळांची घंटाच वाजणार नाही.
टीईटी संदर्भातील अन्यायकारक निर्णय राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यानंतर २३ ऑगस्ट, २०१० रोजी एनसीर्टईने शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली. या नियमानुसार २०१० नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी डीएड, बीएड प्लस टीईटी अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र शासनानुसार १३ फेब्रुवारी २०१३ पासून टीईटी लागू केली आहे. याचा अर्थ २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू नाही.
परंतु, १ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक आदेश देत सर्व शिक्षकांना सक्ती केली. फक्त सेवानिवृत्तीलाही पाच वर्षे उरलेल्या शिक्षकांना सूट दिली असली तरी प्रमोशनसाठीही टीईटी बंधनकारक आहे. आरटीई कलम २३ मध्ये सुधारणा करून २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना कायमस्वरुपी संरक्षण देण्यात यावे.
महाराष्ट्र सरकाने शिक्षकांचा प्रश्न तातडीने हाताळावा आणि केंद्रस्तरीय चर्चेला सुरुवात करावी. १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. यासह अन्य मागण्यांसाठी उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जवळपास १२ ते १५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत.
- जिल्ह्यातील शाळांची संख्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळा : १९७०
- जिल्हा परिषद माध्यमिक : ८५६
- कोल्हापूर महापालिका : ५६
- एकूण शाळा : २८८२