कोल्हापुरात ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा जप्त, देणारा अन् घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:10 IST2026-03-17T12:09:44+5:302026-03-17T12:10:28+5:30
बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

कोल्हापुरात ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा जप्त, देणारा अन् घेणाराही पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात बनावट नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. १६) दुपारी अटक केली. राहुल प्रकाश किरुगडे (वय ३३, सध्या रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, मूळ रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर) आणि गुरू राजेंद्र मेंगाणे (२३,रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या नोटा एक लाख ३१ हजार रुपये किमतीच्या आहेत. त्यांच्या चौकशीतून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
एक तरुण बनावट नोटांची विक्री करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने सोमवारी दुपारी रेल्वे स्टेशनबाहेर रिकाम्या जागेत सापळा रचून नोटा देणारा राहुल किरुगडे आणि नोटा घेणारा गुरू मेंगाणे या दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत किरूगडे याच्याकडे ५०० रुपयांच्या २६२ बनावट नोटा मिळाल्या.
किरूगडे याने कोणाकडून नोटा आणल्या? तो कधीपासून हे काम करत आहे? त्याने किती नोटा खपवल्या? कोणाला खपवल्या? या कामात त्याला आणखी कोणाची मदत झाली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले जाईल. अंमलदार मिलिंद बांगर, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, महेश पाटील, गौरव शिंदे, बाबा ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, आदींच्या पथकाने कारवाई केली.
रॅकेटची व्याप्ती मोठी?
पोलिसांच्या अटकेतील किरुगडे हा रंगकाम करतो, तर मेंगाणे हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. ते स्वत: बनावट नोटा छापण्याची शक्यता कमी आहे. त्यांना नोटा पुरवणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर बनावट नोटा कोणी छापल्या? किती छापल्या? कुठे छापल्या? त्या कुठे कुठे खपवल्या? याचा उलगडा होणार आहे.
दोघांच्या घरांची झडती
पोलिसांनी तातडीने अटकेतील किरूगडे याच्या पाडळी खुर्द येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. त्यानंतर गजबरवाडी येथे जाऊन मेंगाणेच्या घराची झडती घेतली. दोघांच्याही घरात विशेष काही मिळाले नाही. दोघांचे मोबाइल जप्त केले आहेत. कॉल डिटेल्सवरून महत्त्वाची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.
५० हजारांत दीड लाखाच्या बनावट नोटा
अटकेतील किरुगडे हा ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन त्याबदल्यात दीड लाखाच्या बनावट नोटा देत होता. मेंगाणे याला एका मित्राकडून याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मोबाइलवर संपर्क साधून तो बनावट नोटा घेण्यासाठी आला होता.
या कलमांनुसार गुन्हा दाखल
अटकेतील दोघांवर भारतीय न्यायसंहिता कलम १७८, १७९ आणि १८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपींना सात वर्षांपासून आजीव कारावासाची शिक्षा होऊ शकतो.