Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसकडे २२०, भाजपकडे २९२ जणांचे उमेदवारी अर्ज; पक्षीय पातळीवर झाली तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:45 IST2025-12-06T18:43:37+5:302025-12-06T18:45:24+5:30
काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायचीय, भाजपने केला निर्धार

Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसकडे २२०, भाजपकडे २९२ जणांचे उमेदवारी अर्ज; पक्षीय पातळीवर झाली तयारी सुरू
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे रणांगण हळूहळू तापत चालले असून, काँग्रेसकडून मैदानात उतरण्यासाठी आतापर्यंत २२० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भारतीय जनता पक्षाकडे २९२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. अन्य पक्षांनीही उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून लढण्यास कोण कोण इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस आणि भाजपने अर्ज मागविले आहेत. तर शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी इच्छुकांची यादी तयार केली आहे. उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाकडे २९२ जणांनी उमेदवारी मागितली असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. २ डिसेंबरपासून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज वितरित करण्यात येत आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील २२० इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. येत्या ८ डिसेंबरपर्यंत काँग्रेस कमिटी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर १३ डिसेंबरपासून काँग्रेस कमिटी येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यातून २० प्रभागांतील उमेदवार निवडले जातील.
दरम्यान, ज्यांना उमेदवारी अर्ज फॉर्म घ्यायचे आहेत, त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायचीय
२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर सभागृहाची मुदत संपल्यानंतर कोरोनाचे संकट आले. परिणामी, निवडणुका पुढे गेल्या. पुढच्या काळात ओबीसी आरक्षणावरून निवडणुका लांबल्या. आता निवडणुका जाहीर होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जाेरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपने केला निर्धार
भाजपने २०१५ मध्ये ताराराणी आघाडीसोबत युती करून ३३ जागा जिंकल्या होत्या. त्यांना सत्ता स्थापन करण्यास अवघ्या आठ जागा कमी पडल्या होत्या. आता तर भाजपसोबत ताराराणी आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आहेत. त्यांना शिंदेसेनेचीही ताकद मिळणार आहे. त्यामुळे भाजपने यावेळी पालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे.