पुढचा हंगाम सुरू तरी मागचा हिशोब देईनात; कोल्हापूर विभागातील १३ साखर कारखान्यांकडे ४४ कोटी थकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:59 IST2025-10-29T17:59:06+5:302025-10-29T17:59:24+5:30
शेतकरी हवालदिल

पुढचा हंगाम सुरू तरी मागचा हिशोब देईनात; कोल्हापूर विभागातील १३ साखर कारखान्यांकडे ४४ कोटी थकीत
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी मागील हंगामातील पूर्ण एफआरपीप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. या कारखान्यांकडे तब्बल ४४ कोटी २८ लाख २३ हजार रुपयांची थकबाकी आहे. तेरा पैकी तब्बल नऊ कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. दुसरा हंगाम सुरू झाला तरी साखर कारखाने मागील हिशोब देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर आटोपला. विभागातील ४० साखर कारखान्यांनी २ कोटी २ लाख ८७ हजार ८१२ टनांचे गाळप केले. सरासरी साखर उतारा ११.९२ टक्के राखत आतापर्यंत ६४५७ कोटी ९४ लाखांची एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत.
मात्र, अद्याप तेरा कारखान्यांकडून ४४ कोटी २८ लाख रुपये देय रक्कम आहे. वास्तविक उसाचे गाळप केल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, दुसरा हंगाम सुरू झाला तरी मागील पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
म्हणून शेतकरी संघटनेच्या रेट्याची गरज
मागील तीन-चार वर्षांपासून ऊसदराच्या आंदोलनाला काहीशी मरगळ आली आहे. संघटनांच्या राहुट्याही जास्त झाल्या आहेत. उसाला दर मिळतो म्हटल्यावर शेतकरीही काहीसे निवांत दिसत आहे. त्यामुळेच कारखानदार सवडीने उसाची बिले काढू लागले आहेत. यासाठी शेतकरी संघटनांच्या रेट्याची गरज आहे. शेतकऱ्यांनो, मरगळ झटका आणि रस्त्यावर उतरा, तरच तुमच्या घामाला दाम मिळेल, असे आवाहन जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने यांनी केले.
प्रलंबित एफआरपीवर खरच व्याज मिळते
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार चौदा दिवसांत गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहेत. या कालावधीत पैसे दिले नाही तर १५ टक्के व्याजही शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, आतापर्यंत विभागातील ‘माणगंगा’ कारखाना वगळता इतरांकडून व्याज मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार थकीत एफआरपी....
कारखाना - थकीत एफआरपी
- आजरा - १ कोटी ९५ लाख ६६ हजार
- राजाराम - ६८ लाख २६ हजार
- कुंभी - ४ कोटी ९७ लाख ३२ हजार
- डी. वाय. पाटील - ३ कोटी ७ लाख ७ हजार
- दालमिया - ७ कोटी २५ लाख ४८ हजार
- इको केन - ५ कोटी ४० लाख ५९ हजार
- ओलम, चंदगड - ५ कोटी ७८ लाख २५ हजार
- नलवडे, गडहिंग्लज - ३ कोटी ७० लाख ४१ हजार
- हुतात्मा - २ कोटी ४७ लाख ६९ हजार
- राजारामबापू, साखराळे - ४ कोटी ४० लाख ५७ हजार
- राजारामबापू, वाटेगाव - १ कोटी ९७ लाख ५९ हजार
- राजारामबापू, कारंदवाडी - २ कोटी २३ लाख ७८ हजार
- दालमिया, शिराळा - ३५ लाख ७७ हजार