Kolhapur: ‘शालेय पोषण आहार’चे दीड कोटी रुपये पडून; पैसे मिळाले नाहीत तर.., भगवान पाटील यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:09 IST2025-02-26T12:07:21+5:302025-02-26T12:09:05+5:30
बुलढाण्याला जमतेय मग कोल्हापूरला का नाही?

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे गेले महिनाभर नोव्हेंबर, डिसेंबर २०२४चे इंधन आणि भाजीपाल्याचे सुमारे दीड कोटी रुपये पडून आहेत. जर येत्या चार दिवसांत हे पैसे मिळाले नाहीत तर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला इशारा शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील यांनी दिला आहे.
पाटील म्हणाले, गेल्या वर्षीची इंधन भाजीपाला बिले अजून मिळालेली नाहीत. अजून सह्या व्हायच्या आहेत, असे शिक्षण विभागातून सांगण्यात येते. पन्हाळा तालुक्याचे २५ टक्के ऑक्टोबर अखेरची रक्कमपण जमा झालेली नाही. डिसेंबर २०२४ पर्यंतची अंड्यांची बिलेही अद्याप सर्व शाळांना मिळालेली नाहीत. सर्व शाळांना दिलेली नाही. चंदगड तालुक्याची २०१७-१८च्या बिलांबाबत पुणे शिक्षण संचालकस्तरावरील पत्र आले होते. चंदगडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या कामाची पूर्तता केली आहे. परंति जिल्हा परिषदस्तरावर हे काम प्रलंबित आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत याबाबत बैठक झाली आहे. स्पष्टपणे यावेळी चर्चा झालेली असताना अजूनही ही बिले कोणामुळे थांबली आहेत, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. कोणाच्या टेबलवर यासंदर्भातील फाईल किती दिवस थांबली, याची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. महिनाभर बिलाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करण्यात कोणाची नेमकी काय अडचण आहे, असाही प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
बुलढाण्याला जमतेय मग कोल्हापूरला का नाही?
जानेवारीची बिले सोमवारी राज्य पातळीवरून जिल्हा परिषदेच्या पातळीवर जमा झाली आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेने मंगळवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी ही बिले शाळांच्या खात्यावर जमा केली आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेला जे जमते ते कोल्हापूर जिल्हा परिषदेला का जमत नाही, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.