When will the Direction Act come into force in the state? MNS MLA questions Home Minister | राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदाराचा गृहमंत्र्यांना सवाल

राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदाराचा गृहमंत्र्यांना सवाल

कल्याण :  आठगाव- कसारा दरम्यान एका धावत्या लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग करीत तिला लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाडसी तरुणाने प्रतिकार केल्याने ती बचावली. इतकेच नाही प्रसंगावधान राखत तिने आरोपीचे फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे आरोपींना अटक झाली. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील यांनी  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विट करुन राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार, असा सवाल केला आहे.

"२५ तारखेला आठगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. बंदी असताना या तरूणांनी रेल्वेत प्रवास कसा केला? असे गुन्हे रोखण्यासाठी राज्यात दिशा कायदा लागू होणार का? " असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, कसारा येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलवर बड्या पदावर कार्यरत आहे. ती  कामानिमित्त दररोज कसारा ते ठाणे दरम्यान प्रवास करते. लॉकडाऊननंतर महिला प्रवाशांकरिता विशेष रेल्वे गाड्या सुरु केलेल्या आहेत. नेहमी प्रमाणे २५ नोव्हेंबर रोजी ती ठाण्याला कामाला गेली होती. कामावरुन सुटल्यावर तिने रात्री ठाण्याहून कसारा येथे येण्याकरीता गाडी पकडली. ठाणे रेल्वे स्थानकातून गाडी सुटली तेव्हा महिला डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. त्यानंतर विविध स्थानकात महिला प्रवासी उतरल्या. 

आठगाव रेल्वे स्थानक येईपर्यंत महिलांचा डबा रिकामा झाला. महिला डब्यात केवळ ही तरुणीच प्रवास करीत होती. आठगाव रेल्वे स्थानकातून गाडीने स्थानक सोडले. तेव्हा धावत्या रेल्वे गाडीत दोन जण चढले. हे दोघेही दारुच्या नशेत तर्र होते. त्यांना पाहून एकटीच असलेली तरुणी प्रथम भयभीत झाली. तिने तिच्या मोबाईलवर त्या दोघांचा फोटा काढून तो तिच्या नातेवाईकांना पाठविला. त्यांना कसारा रेल्वे स्थानकात येऊन थांबण्याचा मेसेज दिला. 

डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी त्या तरुणींचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा सुरु असताना गाडीने कसारा रेल्वे स्थानक गाठले. एका तरुणाने पळ काढला तर एक जणाला कसारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरुणीच्या नातेवाईकांनी पकडले. दुसऱ्या आरोपीला आज कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीची नावे अमोल जाधव व अमन हिले अशी आहेत.

Web Title: When will the Direction Act come into force in the state? MNS MLA questions Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.