CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
By पंकज पाटील | Updated: July 7, 2025 20:08 IST2025-07-07T20:06:38+5:302025-07-07T20:08:48+5:30
अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून पडल्याने दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने मागून कोणतेही वाहन न आल्याने या चिमुकल्यांचा जीव वाचला. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
हे विद्यार्थी पडले, त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता, तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते. या अपघातात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्या विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली असून त्यांनी लागलीच स्कूल व्हॅनचा चालक सोलमन सकप्पा, स्कूल व्हॅनची लेडी अटेंडंट उषा बळीद आणि कविता जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी रस्त्यावर पडले; वाहन चालकांसह तिघांवर गुन्हा#Ambernath#SchoolVan#Accidentpic.twitter.com/HKu3MuN3N6
— Lokmat (@lokmat) July 7, 2025
खासगी स्कूल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः २०-२० मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही उपाययोजना केल्या जात नाही. अनेक शाळांमध्ये खाजगी व्हॅन मधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओने मंजूर केलेली स्कूल व्हॅनच अधिकृत असताना देखील खाजगी वाहनातून ही वाहतूक केली जात आहे. आज ज्या व्हॅन मधून ही घटना घडली ती व्हॅन देखील पांढऱ्या नंबर प्लेटची असून ती खाजगी वापरासाठी होती. मात्र त्या व्हॅनमध्ये सोयीनुसार बसण्याची वाढीव सोय करून विद्यार्थ्यांना कोंबून भरण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात आरटीओ मार्फत या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईला न जुमानता खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांची ने आण सुरू आहे.