Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 06:20 IST2025-11-19T06:18:58+5:302025-11-19T06:20:29+5:30
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली.

Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान!
कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. या नाराजीचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर उमटले. या नाराजीतूनच शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. शिंदेसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते.
मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वी शिंदेसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र मला मंत्रिमंडळ बैठकीला जावे लागेल असे सांगत शिंदे बैठकीला हजर राहिले. या नाराजी नाट्याची मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत गेले होते.
का बळावली नाराजी? ३ कारणांची चर्चा
कल्याणमध्ये शिंदेसेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये
कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपने आपल्याकडे खेचले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः त्यात लक्ष घालत आहेत. एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत.
विरोधातील नेत्यांना दिलेला पक्षप्रवेश
शिंदेसेनेचे मंत्री व आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात राजू शिंदे, दादा भुसे यांच्या मतदारसंघात अद्वय हिरे, शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात सत्यजित पाटणकर अशा विरोधी पक्षातील लोकांना भाजपने प्रवेश दिला.
उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नियुक्ती केली. शिंदेसेनेच्या नेत्यास हे पद मिळावे अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली होती. मात्र महापालिका निवडणुकीआधी तसे करणे योग्य होणार नाही, त्याचा भावनिक मुद्दा उद्धवसेना करेल असे मुख्यमंत्र्यांचे मत होते, असेही सूत्रांनी सांगितले.
सुरुवात कोणी केली? मुख्यमंत्र्यांनी सुनावले
ठाणे-कोकण पट्ट्यात भाजप नेते शिंदेसेनेच्या नेत्यांची पळवापळवी करीत असल्याची नाराजी शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर, मुख्यमंत्री म्हणाले, सुरुवात तर तुम्हीच केली ना? उल्हासनगरमध्ये आधी कोणी कोणाला पळवले, हे सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही केले तर चालवून घ्यायचे व भाजपने केले तर चालणार नाही, असे कसे होईल? येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका; पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याचे समजते.
शिंदेसेनेचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या बैठकीत यापुढे महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट या तीनही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय झाल्याचे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांचे प्रवेश करून घेऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मीही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कुठेही महायुतीत मतभेद होणार नाहीत याची काळजी घेऊ.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आमच्यात कुठलीच नाराजी नाही, कुठलेही गैरसमज नाहीत. महायुती मजबूत आहे. महायुतीचा धर्म एकमेकांनी पाळला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. महायुतीत कुठेही मतभेद, मनभेद होऊ नयेत याची काळजी घेऊ.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री