"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:20 IST2026-01-07T13:16:52+5:302026-01-07T13:20:28+5:30
Ambernath Local Body Election 2025: अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आघाडी, शिंदेसेना एकाकी...

"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
Ambernath Local Body Election 2025: अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ होते. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. महापालिका निवडणुकीच्या गदारोळात शिंदेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
"काही लोक सत्तेसाठी अशाप्रकारची आघाडी काही करत असतील, तर यात वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे. शिवसेना कायम विरोधात बसलेली आहे. शिवसेनेला विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडणार नाही. पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून या गोष्टीकडे पाहतात, ते महत्त्वाचे आहे. आज ज्या प्रवृत्तीच्या विरोधात शिंदे यांनी उठाव केला, त्याच प्रवृत्तीबरोबर पुन्हा एकत्र जाण्याचे काम काही लोक स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. मला असे वाटते की याबाबत आता वरिष्ठांनी योग्यप्रकारे निर्णय करणे आवश्यक आहे. सत्ता हेच सर्वस्व नाही, हे वरिष्ठांनी त्यांना लक्षात आणून दिले पाहिजे," अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वावर टीका केली.
अंबरनाथमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो असून या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शहरासाठी आम्ही वचनबद्ध असल्यामुळेच आम्ही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे, असे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील म्हणाले. तर शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू, असे काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले.
दुसरीकडे, शिंदेसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर युती होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती केली, असे शिंदेसेनेचे डॉ. बालाजी किणीकर म्हणाले होते