एमआयडीसीचे भू भाडे भरण्यास ६०० पैकी ८४ निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:21 IST2026-05-14T13:21:24+5:302026-05-14T13:21:48+5:30
एमआयडीसीमधील निवासी भूखंडधारकांना ०४ ते १५ मे पर्यंत भू भाडे देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवार १४ मे पर्यंत अंदाजे ६०० निवासी भुखंड असताना अवघ्या ८४ जणांनी म्हणजे १४% जणांनी भू भाडे भरल्याची माहिती समोर आली आहे.

एमआयडीसीचे भू भाडे भरण्यास ६०० पैकी ८४ निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद
डोंबिवली - एमआयडीसीमधील निवासी भूखंडधारकांना ०४ ते १५ मे पर्यंत भू भाडे देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवार १४ मे पर्यंत अंदाजे ६०० निवासी भुखंड असताना अवघ्या ८४ जणांनी म्हणजे १४% जणांनी भू भाडे भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे १५ मे रोजी भू भाडे भरण्यासाठी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात अखेरचा दिवस असल्याने या दिवशी आता किती जण भू भाडे भरण्यासाठी येणार हे पाहावे लागेल. तिथले वार्षिक भुखंड भाडे एक रुपया हे भरण्यासाठी ठाणे येथे जावे लागत असे. त्यासाठी प्रवासात वेळ व पैसा खर्च होत होता.
अनेक भुखंडधारकांचे मागील काही वर्षांपासून हे भू भाडे भरले गेले नव्हते. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात तसेच ऑनलाईन पद्धतीने भू भाडे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने पत्र व्यवहार व पाठपुरावा केला होता. भाजप आमदार संजय केळकर यानी त्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन तात्पुरत्या स्वरूपात ते भू भाडे भरण्यासाठी ही सुविधा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात उपलब्ध करून दिली होती. मात्र तरीही एकंदर हे वार्षिक भू भाडे भरण्यास निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. त्याची मुख्य चार कारणे आहेत. भू भाडे भरण्यासाठी अल्पमुदत दिली आहे त्यात शनिवार,रविवार एमआयडीसी कार्यालयाला सुट्टी असते.
भुखंडधारकांना आपली भरायची बाकी शिल्लक रक्कम किती आहे हे समजून येत नसल्याने अंदाजित रक्कम भरून त्याची पडताळणी एमआयडीसी ठाणे कार्यालयात होऊन काही दिवसांनी त्याची अंतिम पावती तयार होऊन डोंबिवली कार्यालयात येत आहे. त्यामुळे भुखंडधारकांना दोनदा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात फेरी मारावी लागत आहे. मे महिना हा सुट्टीचा असल्याने अनेक रहिवाशी गावी किंवा फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. कडक उन्हाळा, असल्याने उन्हात बाहेर पडण्यास नागरिकांची मानसिकता नसल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे म्हणाले.
शुक्रवार, १५ मे या अखेरच्या दिवशी राहिलेल्या निवासीधारकांनी आपले भुखंड भाडे भरावे असे आवाहन मिलापनगर रेसि. वेलफेअर असोसिएशनने केले आहे. तसेच एमआयडीसीने भू भाडे भरण्याची सुविधा कायमस्वरूपी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात तसेच ऑनलाईन करावी अशी मागणी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने एमआयडीसीकडे केली आहे.