जमत नाही, तर एसी लोकल चालवता तरी कशाला? प्रवाशांच्या संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:57 IST2025-10-31T12:57:13+5:302025-10-31T12:57:25+5:30
मन:स्ताप देणारा गारेगार प्रवास काय कामाचा?

जमत नाही, तर एसी लोकल चालवता तरी कशाला? प्रवाशांच्या संतप्त भावना
डोंबिवली : वातानुकूलित लोकल वेळेत चालवणे मध्य रेल्वेला जमत नसल्याने प्रवासी संतापले आहेत. महागडे तिकीट काढूनही कधीही त्या लोकल वेळेत नसतात. तिकिटाचा खर्च, वेळेत लोकल नसल्याने प्रवाशांच्या पदरी दुहेरी मनःस्ताप होत असल्याची टीका महिला प्रवाशांनी केली.
सकाळी डोंबिवली स्थानकात ९:०९च्या सुमारास येणारी एसी लोकल कधीही वेळेत नसते. दुपारी १:१०ची बदलापूरला जाणारी लोकल वेळेत नाही, सकाळी ११:००च्या सुमारास येणारी लोकलही कधीच वेळेत नसल्याने प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फेरले जाते. असला मनःस्ताप देणारा गारेगार प्रवास करायचा काय, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलआधी काढण्यात येत असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडते. याबाबत कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळा, बदलापूरच्या प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.
लांब पल्ल्याच्या गाड्या पुढे पाठवून लोकल गाड्या त्यानंतर मार्गस्थ होत असल्याने संताप व्यक्त होतोय.
प्रवासी संख्या वाढल्याने रोजचाच लटकून प्रवास
दिवसागणिक लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. रोज प्रवासी लटकून प्रवास करताना पडून मृत्यू होतो. काही प्रवासी जखमी होतात. त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक सणाच्या मुहूर्तावर विशेष ट्रेन सुरू करण्यात येतात.
सद्यस्थितीत लोकल रोज २० मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रत्येक लोकलच्या पुढे दोन ते तीन विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असल्याचे कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष राजेश घनघाव म्हणाले.
त्याबद्दल कसारा, कर्जत मार्गावरील  प्रवासी ऑनलाइन, प्रत्यक्ष स्थानकावर जाऊन तक्रार करतो. मात्र, तक्रारीकडे रेल्वेला गांभीर्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.