आरोग्य सेवेसाठी केडीएमसीचा अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी करार
By मुरलीधर भवार | Updated: April 21, 2026 17:49 IST2026-04-21T17:48:56+5:302026-04-21T17:49:18+5:30
- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देता यासाठी महापालिकेने अंबरनाथच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत ...

आरोग्य सेवेसाठी केडीएमसीचा अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी करार
- मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देता यासाठी महापालिकेने अंबरनाथच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली थवील, उपमहापौर राहूल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, उद्धव सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, का’ग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापालिकेचे कल्याण पश्चिमेती रुक्मीणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णलयात आरोग्य सेवा देण्याचा हा सामंजस्य करार आहे. अंबरनाथमधील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन सेवा अनुभव मिळण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार सात वर्षाकरीता आहे. सगळयात प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालय हे अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहे. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे सर्व विशेषज्ञ बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात येतील. त्यानंतर अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय, तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन स्त्री रोग आणि बालरोग तज्ञ हे विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यानंतर कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयाच्या इमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर हे रुग्णालय ताब्यात घेऊन त्याठिकाणी आराेग्य सेवा देणारे विविध विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
महापालिकेची रुग्णालये अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न झाल्यावर वैद्यकीय महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय. अधिकारी आणि इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यांच्यामार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा महापालिका हद्दीतील नागरीकांना देणे शक्य हेणार आहे.