Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:44 IST2025-11-19T08:41:21+5:302025-11-19T08:44:00+5:30
Mahesh Patil Allegations: कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
डोंबिवली: शिंदेसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, त्यांची बहीण माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांनी मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शिवसेनेचे पाच वेळा नगरसेवक राहिलेले वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेसेनेला जोरदार हादरा दिला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महेश पाटील यांनी शिंदेसेनेवर गंभीर आरोप केले. माजी नगरसेवक ‘मोक्का’चा आरोपी कुणाल पाटील यांना क्लीन चीट दिली. तसेच मला आणि माझा मुलगा साईश पाटील याला मारण्याचा कट त्यांचे काका वडार पाटील यांनी रचला होता. अशा आरोपींना अटक करू नका, असा दबाव शिंदेसेनेतील नेते टाकत होते. त्यामुळे मी गेले दोन दिवस प्रचंड दडपणाखाली होतो, अखेर त्या पक्षात राहणे मला जमले नाही, असे पाटील म्हणाले. भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शशिकांत कांबळे उपस्थित होते.
वामन म्हात्रेंच्या मुलाचाही भाजपत दणक्यात प्रवेश
दिवंगत शिंदेसेना नगरसेवक वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल म्हात्रे यांनीही कुटुंबीयांसमवेत चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. म्हात्रे कुटुंबीय कट्टर शिवसैनिक असल्याची सर्वत्र ख्याती होती, परंतु आता घरामध्ये आगामी निवडणूक उमेदवारीवरून दुफळी झाल्याने अनमोल यांनी स्वतंत्र निर्णय घेत भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. जे गेले आहेत, त्यांना आणि मित्र पक्षाला खूप-खूप शुभेच्छा. कोणाच्या जाण्याने शिंदेसेनेला काही फरक पडत नाही, असे या प्रवेशानंतर घेतलेल्या पत्र परिषदेत आ. राजेश मोरे यांनी म्हटले. विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम उपस्थित होते.