Kalyan Traffic Update:कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण- शीळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी ५ फेब्रुवारी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत या पाच दिवसांच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. ५ फेब्रुवारी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंतच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे म्हटले जाते.
पर्यायी वाहतूक मार्ग कोणते?डोंबिवली, कल्याण भागातील वाहन चालकांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा लागणार आहे. शिळफाटा मार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या वाहन चालकांना काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुद्ध मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
याचबरोबर, या कालावधीत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे. दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गांचा वापर वाहनांनी करू नये, त्यासोबत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना पुलाच्या कामासाठी अट्टाहास कशासाठी? असा सवाल करत पलावा पुलाच्या दोन्ही बाजूचे भूसंपादन झाले आहे. तो पूल पहिला सुरू करा व नंतर पुढचे काय ते ठरवा, असे मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी म्हटले आहे.