'आम्हाला एअर इंडियाकडून फोन आला नाही, पण...', रोशनी सोंनघरेच्या मामाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:52 IST2025-06-13T11:51:25+5:302025-06-13T11:52:22+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात डोंबिवलीतील रोशनी सोंनघरेचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

'आम्हाला एअर इंडियाकडून फोन आला नाही, पण...', रोशनी सोंनघरेच्या मामाची प्रतिक्रिया
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्सचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीतील रहिवासी रोशनी सोंनघरे(२७) हिचाही समावेश आहे. रोशनी दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. लहानपणापासूनच तिचे एअर हॉस्टेस बनण्याचे स्वप्न होते. पण, याच स्वप्नाने तिचा घात केला.
एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणारी रोशनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील होती. इंस्टाग्रामवर तिचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. दरम्यान, विमान अपघातात तिचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, रोशनीला लहानपणापासून एअर हॉस्टेस बनायचे होते. १० बाय १० खोलीतून तिचा प्रवास सुरू झाला होता. रोशनीचे वडील एका कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करायचे.
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
एअर इंडियात नोकरी सुरू करण्यापूर्वी रोशनीने स्पाइस जेट मध्ये दोन वर्षे काम केले होते. अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ती गावी आली होती. तिने आजी आजोबा, काका काकी यांची भेट घेतली, कुलदैवताचे दर्शन घेतले. घरी परतल्यानंतर लगेच तिला ही लंडनची फ्लाईट मिळाली. एक आठवड्यापूर्वीच माझे तिच्याशी बोलणे झाले होते. तिच्या निधनाबद्दल आईला काहीच सांगितलेले नाही. तिचा मोठा भाऊ,वाहिनी आणि वडील अहमदाबादला गेले आहेत. आम्हाला अद्याप एअर इंडिया कडून अधिकृतरित्या फोन आलेला नाही, मात्र एअर इंडियाचे काही सहकारी अहमदाबादला कुटुंबासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया रोशनीच्या मामाने दिली.