लग्न ठरले... लवकरच होणार होता साखरपुडा; पण त्याआधीच रोशनीला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:16 IST2025-06-14T10:15:20+5:302025-06-14T10:16:38+5:30

Roshani Songhare News: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखरपुडा होणार होता.

Ahmedabad Air India Plane Crash: The wedding was decided... The engagement ceremony was going to happen soon; but before that, Roshni died. | लग्न ठरले... लवकरच होणार होता साखरपुडा; पण त्याआधीच रोशनीला मृत्यूने गाठले

लग्न ठरले... लवकरच होणार होता साखरपुडा; पण त्याआधीच रोशनीला मृत्यूने गाठले

डोंबिवली - अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखरपुडा होणार होता. फेब्रुवारी-मार्चमध्ये लग्न होते. त्यासाठी हॉलची शोधाशोधही सुरू होती; पण त्याआधीच विमान दुर्घटनेत रोशनीवर काळाने घाला घातला. तिच्या कुटुंबासह मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनघरे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आहे. नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 

तिने जिद्दीने गाठले ध्येय 
रोशनी हिने शालेय शिक्षण घेत असतानाच हवाईसुंदरी होण्याचे ध्येय बाळगले होते. आधी दोन वर्षे स्पाइस जेट व नंतर एअर इंडिया विमान कंपनीत क्रू-मेंबर म्हणून ती काम करीत होती. रोशनीने मोठ्या जिद्दीने आपले ध्येय गाठले होते. दोनच दिवसांपूर्वी ती गावी गेली होती.

१५ वर्षांनी पुनरावृत्ती  
२२ मे २०१० ला मंगळूर एअरपोर्टवर अहमदाबादप्रमाणेच अपघात झाला होता. त्या विमान दुर्घटनेत १६६ पैकी १५८ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सहा विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात केबिन क्रू-मेंबर आणि डोंबिवलीकर असलेल्या तेजल कामूलकर हिचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दोन दिवसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. १५ वर्षांनंतर रोशनीच्या मृत्यूने पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली.

हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न
कुटुंबातील रोशनी सर्वात मोठी  होती. लहानपणापासून तिचे हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न होते. तिचे लग्न ठरले होते. लवकरच साखरपुडा होणार होता. लग्नासाठी हॉलची शोधाशोध सुरू होती. तिचा मृत्यू कुटुंबासाठी धक्कादायक घटना असल्याचे तिचे काका दत्ता सोनघरे यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अहमदाबादला जाण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक केले.
अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी एअर इंडिया विशेष विमान सोडणार असल्याची माहिती मिळाल्याने रोशनीचे वडील आणि भाऊ संध्याकाळी ५ वाजता मार्गस्थ झाले. रोशनीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनएचे नमुने घेण्यात आले. अहवालास ७२ तास लागतील, अशी माहिती दिल्याचे सोनघरे यांनी सांगितले.

Web Title: Ahmedabad Air India Plane Crash: The wedding was decided... The engagement ceremony was going to happen soon; but before that, Roshni died.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.