सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुली पाठोपाठ मावशीचेही निधन; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:36 IST2025-10-01T09:35:37+5:302025-10-01T09:36:06+5:30
खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला.

सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुली पाठोपाठ मावशीचेही निधन; परिसरात खळबळ
कल्याण : खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे तिच्या नातेवाइकांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात धडक देऊन मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली.
खंबाळपाडा परिसरात राहणारी प्राणवी भोईर (४) या चार वर्षाच्या मुलीला साप चावला. तिला नेमके काय झाले आहे हे सांगता येत नव्हते.
मात्र, तिची मावशी श्रुती ठाकूर (३४) हिलाही सर्पदंश झाल्याने घरच्यांना प्राणवीलाही सर्पदंश झाल्याचे कळले. दोघींनाही तात्काळ शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मुलीला सर्पदंश वरील लस देण्यात आली होती. मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, दुसऱ्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच तीने प्राण सोडले. तिच्या मावशीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, तिचीही प्रकृती बिघडत गेली आणि उपचादारम्यान तीदेखील दगावली. त्यानंतर संतप्त नातेवाईक सत्यवान म्हात्रे, रवी बनसोडे आणि भाऊ पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागात घाव घेतली.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्या दालनात ठिय्या आंदाेलन करुन मुलगी आणि मावशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
कारवाईचे लेखी आश्वासन
जोपर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन दिले जात नाही. ताेपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाइकांनी दिला. अखेर मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ल यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, लेखी आश्वासनानंतरही कारवाई झाली नाही तर शास्त्रीनगर रुग्णालयासह पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला देण्यात आला आहे.
श्रुतीचे पुढील महिन्यात होते लग्न
श्रुती ठाकूर हिचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. तिचा मृत्यू झाल्याने ठाकूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्मशानभूमीतील कर्मचारी दारूच्या नशेत
श्रुती ठाकूर हिचा मृतदेह तिच्या नातेवाइकांनी खंबाळपाडा स्मशानभूमीत नेला असता त्याठिकाणी कामावर असलेला कर्मचारी हा दारुच्या नशेत होता. त्याचा व्हिडीओ ही ठाकूर हिच्या नातेवाइकांनी प्रशासनाला सादर केला आहे.