Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार

By नितीन पंडित | Updated: October 3, 2025 17:07 IST2025-10-03T17:06:00+5:302025-10-03T17:07:17+5:30

Bhiwandi Crime: भिवंडीत हत्येचा आरोपाखाली फरार असलेल्या आरोपीने आणखी एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली.

Accused who absconded from the court in Bhiwandi tortured and murdered a child | Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार

Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार

Bhiwandi Crime: सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीस भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर या नराधम विकृत आरोपीने पुन्हा एकदा दुष्कृत्य करीत एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.सलामत अन्सारी वय ३४ रा. मधुबनी बिहार असे अटक आरोपीचे नाव आहे. दुर्दैव म्हणजे आरोपी न्यायालयातून पळून गेल्या नंतर दोन महिने शहरात राहत असल्यानेही पोलिस त्यास अटक करण्यात अपयशी ठरल्याने भिवंडी पोलिसांचे अपयश चव्हाट्यावर आले आहे.

बुधवारी १ ऑक्टोबर रोजी शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील सात वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचालयासाठी काही अंतरावरील चाळीच्या सार्वजनिक शौचालयात गेली होती.बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता नजिकच्या चाळीतील एका बंद खोलीत चिमुरडीने शौचालयास जाताना सोबत नेलेली बादली आढळल्याने नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. तर तेथे एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत चिमुरडीचा मृतदेह तोंडात कुरकुरे कोंबलेला अवस्थेत निपचित पडलेला आढळला.

आरोपी सलामत हा काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील एका खोलीत भाड्याने राहण्यासाठी एक आठवडे पूर्वी राहण्यास आला होता. घटनेनंतर भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दिवाण शहा तलाव येथे आरोपी संशयित अवस्थेत फिरत असताना भोईवाडा पोलिसांनी त्यास अटक करत त्याचा ताबा निजामपूर पोलिसांकडे सोपवला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सुद्धा तसेच मारून टाकावे तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला व आम्हाला शांती मिळेल अशी मागणी पीडितेच्या आईने टाहो फोडत केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चाळ मालकाने चाळीत राहायला आलेल्या भाडेकरुची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतांनाही चाळ माकलाने पोलीसांना कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे चाळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.

पोलिसांचे अपयश चव्हाट्यावर

आरोपी सलामत हा मानसिक विकृत नराधम असून त्याने १३ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील फेणेगाव येथे चाळीतील सहा वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून हत्या करीत मृतदेह बादलीमध्ये कोंबून पसार झाला होता.या घटनेनंतर पोलिसांनी नराधम सलामत अन्सारी यास बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावातून अटक केली. न्यायालयीन सुनावणीसाठी त्यास ४ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणले असता पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता. यावेळी देखील पोलीस प्रशासनावर टीका झाल्याने बंदोबस्तावरील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनातरही आरोपी पळून गेल्या नंतर दोन महिने शहरात राहत असल्यानेही पोलिस त्यास अटक करण्यात अपयशी ठरल्याने भिवंडी पोलिसांचे अपयश चव्हाट्यावर आले आहे.तर अपयश लपविण्यासाठी पोलीस चाळ मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Accused who absconded from the court in Bhiwandi tortured and murdered a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.