आश्वासनांचा नुसताच बुडबुडा; भर पावसाळ्यात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट

By प्रशांत माने | Published: October 4, 2023 03:19 PM2023-10-04T15:19:28+5:302023-10-04T15:20:48+5:30

टँकरच्या पाण्यावर रहिवाशांची भिस्त, सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंंड

A mere bubble of promises; Congestion of water in Nandivali during rainy season | आश्वासनांचा नुसताच बुडबुडा; भर पावसाळ्यात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट

आश्वासनांचा नुसताच बुडबुडा; भर पावसाळ्यात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट

googlenewsNext

डोंबिवली: आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असलातरी ऐन पावसाळयात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट जाणवतोय. गेली दोन ते तीन वर्षापासून भेडसावत असलेली टंचाई जून महिन्यांपासून अधिक प्रकर्षाने जाणवतेय. पाणी पुरवठा सुरळीत आज होईल, उदया होईल अशी आश्वासन केडीएमसीकडून दिली जात आहेत परंतू समस्या सुटलेली नाही. परिणामी इथल्या रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी प्रतिदिन ५०० रूपये मोजावे लागत आहेत.

नांदीवली भागातील नांदीवली टेकडी, मोहाची वाडी आणि मधला पाडा याठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणी पुरवठा सुधारणा करण्यासाठी रहिवाशांनी वारंवार पत्रव्यवहार केले आहेत पण कोणतीच ठोस कार्यवाही न करता पत्रांना केराची टोपली दाखविली जात असून अधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ही समस्या उदभवत असल्याची कारणं मनपाकडून दिली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असेलतर बुस्टर पंप लावण्याची परवानगी दयावी अशीही मागणी रहिवाशांनी केली असता ती परवानगी नाकारण्यात आली. तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई भेेडसावत असताना मोफत पाण्याचा टॅंकर पुरविण्याची मागणी देखील मनपाने नाकारली आहे. त्यामुळे दररोज ५०० रूपये खर्चुन पाण्याचा टँकर मागवावा लागत असल्याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले.

...मग आंदोलनाशिवाय पर्याय नाही

जून महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. ही पाणीटंचाई चार महिने कायम जाणवत असताना मनपाकडून केवळ आश्वासन दिली जात आहेत. सध्या रहिवाशांच्या भावना तीव्र आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा रहिवाशी तथा शिवसेनेचे नांदीवली गाव विभागप्रमुख अनिल म्हात्रे यांनी दिला आहे.

कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा

२७ गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होतो परंतू गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील पाणी समस्या कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभ उभारणी आणि जलवाहीन्या टाकण्याची कामे देखील सुरू आहेत अशी माहिती केडीएमसी ई प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: A mere bubble of promises; Congestion of water in Nandivali during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.