कानामागून आला अन् हुशार झाला...असं वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. म्हणजे सोबत काम करणारी एखादी व्यक्ती त्याच्या कर्तुत्वानं पुढे जात असेल किंवा त्यांना एखादं मोठं पद मिळत असेल आणि ते कुणाला रूचलं नसेल तर असं म्हटलं जातं. ऑफिसमध्ये काम करत असताना काही लोक दुसऱ्या सहकाऱ्यांबाबत वेगवेगळ्या गोष्टींचा द्वेष, राग मनात ठेवतात. जर सहकाऱ्याचं कौतुक केलं आणि तुमचं केलं नाही तरी काही लोकांना राग येतो. सोबत काम करणाऱ्या व्यक्तीचं प्रमोशन झालं आणि तुम्ही तिथेच राहिलात तरी वाईट वाटतं. एकवेळ वाईट वाटणं ठीक पण, एका महिलेनं तिच्याच मैत्रिणीसोबत असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.
ब्राझीलच्या गोइस स्टेटमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या सहकारी महिलेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. असा आरोप आहे की, प्रमोशनवरून झालेल्या वादानंतर महिलेनं आपल्या सहकारी महिलेच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विषारी पदार्थ टाकला होता. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार, अबाडिया डी गोइस भागातील एका कापड कंपनीत ही घटना घडली. पोलिसांनुसार, ३८ वर्षीय आरोपी महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित महिलेच्या पाण्याच्या बॉटलसोबत छेडछोड करताना दिसत आहे. पीडितेनं पाणी प्यायल्यावर तिला घशात जळजळ झाली आणि नंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. टेस्टमधून समोर आलं की, तिनं एक घातक केमिकल सेवन केलं होतं. ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकला असता.
मैत्रीणच झाली वैरी
चौकशीतून समोर आलं की, आरोपी आणि पीडिता दोघी आधी चांगल्या मैत्रिणी होत्या. पण पुढे पीडितेचा प्रमोशन मिळालं. आरोपी महिलेला हे रूचलं नाही आणि त्यांच्यात भांडणं होऊ लागली. यादरम्यान आरोपीनं विषारी केमिकल चोरी करून आणलं होतं.
सीसीटीव्ही फुटेजमुळे खुलासा
सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर २७ फेब्रुवारीला आरोपी महिलेला अटक करण्यात आली. तिची चौकशी केल्यावर तिनं आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की, हे काम केलं तेव्हा ती रागात होती. आता तिच्यावर हत्येच्या प्रयत्नाची केस चालवली जात आहे. ज्यानंतर तिला ६ ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.