VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:51 IST2025-10-09T13:50:47+5:302025-10-09T13:51:59+5:30
एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या पाठीच्या खालच्या भागातील दुखण्यावर जो देसी इलाज शोधला, तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

AI Generated Image
चीनच्या झेजियांग प्रांतातील हांग्झो शहरातून एक अजब आणि गंभीर बातमी समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या पाठीच्या खालच्या भागातील दुखण्यावर जो देसी इलाज शोधला, तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या हर्नियेटेड डिस्कच्या त्रासाने त्रस्त असलेल्या आजींनी हा उपाय केला आणि त्यांना तो चांगलाच महागात पडला.
जिवंत बेडूक गिळण्याचा सल्ला
झांग नावाच्या या वृद्ध महिलेला पाठीच्या दुखण्यावर कोणीतरी अंधश्रद्धेवर आधारित असा सल्ला दिला होता की, जर तिने जिवंत बेडूक गिळले, तर तिचे पाठीचे दुखणे क्षणात पळून जाईल. मग काय विचारता, या आजींनी कोणताही विचार न करता थेट कुटुंबातील सदस्यांना आठ लहान जिवंत बेडूक आणायला सांगितले.
आठही बेडूक गटागट गिळून टाकले!
आठही बेडूक गिळल्यानंतरही त्यांचे दुखणे कमी झाले नाही, उलट प्रकृती बिघडली. आता तुम्ही कल्पना करू शकता की यानंतर काय झाले असेल. या उपायामुळे पाठीचे दुखणे तर कमी झालेच नाही, उलट हा विचित्र उपाय त्यांच्यावर उलटला. बेडूक गिळल्यानंतर लगेचच वृद्ध महिलेची पचनक्रिया बिघडली आणि त्यांच्या पोटात इतका असह्य त्रास सुरू झाला की त्यांना चालणेही कठीण झाले. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेच्या मुलाने डॉक्टरांना सांगितले की, "आईने ८ जिवंत बेडूक गिळले आहेत," तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, बेडकांमुळे महिलेच्या शरीरात 'स्पार्गनम' नावाचे खतरनाक परजीवी शिरल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयातील एका डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले की, बेडूक गिळल्यामुळे रुग्णाचे पचन तंत्र मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. एवढेच नाही, तर परजीवींच्या संसर्गाचे संकेत देणाऱ्या ऑक्सीफिल पेशींमध्ये देखील वाढ झाल्याचे आढळले. एका चुकीच्या आणि अंधश्रद्धेवर आधारित उपायामुळे या वृद्ध महिलेचा जीव धोक्यात आला आहे.