शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:41 IST2025-10-01T18:39:24+5:302025-10-01T18:41:29+5:30
iPhone 4 आणि iPad 2 खरेदी करण्यासाठी एक किडनी विकली. त्यावेळी कल्पनाही नव्हती की, त्याची ही हौस पुढे त्याला आयुष्यभरासाठी दिव्यांग बनवेल.

शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
कधीकधी एखादी गोष्ट आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते, अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. चीनमधील रहिवासी वांग शांगकुन याने वयाच्या १७ व्या वर्षी एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे. २०११ मध्ये त्याने iPhone 4 आणि iPad 2 खरेदी करण्यासाठी त्याची एक किडनी विकली. त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की, त्याची ही हौस पुढे त्याला आयुष्यभरासाठी दिव्यांग बनवेल.
वांग शांगकुन एका अतिशय गरीब कुटुंबातून आला होता. त्याला ऑनलाईन चॅट रूममध्ये त्याची किडनी विकण्याची ऑफर मिळाली. एका दलालाने त्याला त्याची किडनी विकण्यासाठी २०,००० युआन (सुमारे २.५ लाख रुपये) देण्याचं आश्वासन दिलं. मोहात पडून त्याने लगेच होकार दिला. वांग हुनान प्रांतातील एका छोट्या गावात पोहोचला, जिथे योग्य सुरक्षा आणि स्वच्छतेशिवाय स्थानिक रुग्णालयात त्याची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर त्याची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही आणि त्याची किडनी काढून विकण्यात आली. त्याला पैसे देण्यात आले, त्या पैशातून त्याने आयफोन आणि आयपॅड खरेदी केला.
आयुष्यभराचं दुखणं
गॅझेट्सचा आनंद फार काळ टिकला नाही. काही महिन्यांतच वांगची तब्येत बिघडू लागली. त्याच्या दुसऱ्या किडनीला इन्फेक्शन झालं. डॉक्टरांनी अस्वच्छ परिस्थिती आणि निष्काळजीपणामुळे बॅक्टेरिया पसरल्याची माहिती दिला. त्याची प्रकृती आणखी बिकट झाली, ज्यामुळे त्याची किडनी आता २५% कार्य करते. आता ३१ व्या वर्षी, वांग दिव्यांग झाला आहे आणि जगण्यासाठी डायलिसिस मशीनवर अवलंबून आहे. एका चुकीचे त्याला आता गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
"आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही"
आयफोन १७ प्रो सारख्या महागड्या फोनमुळे, अनेक तरुण महागड्या गॅझेट्सच्या मागे लागून चुकीचा मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त होतात. वांग शांगकुनची दुःखद गोष्ट सर्वांना इशारा देते. तो आता सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये त्याची गोष्ट शेअर करतो जेणेकरून लोक त्याच्या चुकीतून शिकू शकतील. वांग म्हणतो की, कोणत्याही किंमतीत आपल्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. त्याचा हा उपक्रम तरुणांना बेकायदेशीर अवयव विक्री आणि अशा इतर गोष्टींच्या मोहांपासून वाचवण्याचा प्रयत्न आहे.