239 प्रवाशांसह 10 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेले विमान; आता सरकारने पुन्हा सुरू केली शोधमोहीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:00 IST2025-12-03T15:00:10+5:302025-12-03T15:00:58+5:30
Malaysia Missing Plane : ही घटना जगभरातील तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि विमानन क्षेत्रातील अभ्यासकांसाठी आजही एक मोठे कोडे आहे.

239 प्रवाशांसह 10 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेले विमान; आता सरकारने पुन्हा सुरू केली शोधमोहीम...
Malaysia Missing Plane : आतापर्यंत अनेक विमाने रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. यातील अनेक विमानांचा शोध लागला, तर काही अजूनही सापडले नाहीत. असेच एक विमान मलेशियन एअरलाइन्सचे होते, जे दीड दहशकापूर्वी अचाक बेपत्ता झाले होते. आता मलेशियाच्या सरकारने या विमानाचा शोध पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
239 प्रवासी अन् विमान अचानक बेपत्ता
8 मार्च 2014 रोजी कुआलालंपूरहून बीजिंगकडे निघालेले बोईंग 777 विमान उड्डाणानंतर काही तासांतच रडारवरून गायब झाले. विमानामध्ये 239 प्रवासी आणि कर्मचारी होते. मोठ्या प्रमाणात शोधकार्य होऊनही विमानाचे अवशेष आजतागायत सापडलेले नाहीत. ही घटना आजही विमानन इतिहासातील सर्वात मोठे आणि गूढ रहस्य मानली जाते. आता पुन्हा एकदा मलेशियन सरकार येत्या 30 डिसेंबरपासून या विमानाचा शोध सुरू करेल.
कुटुंबियांना सांत्वना देण्याचा प्रयत्न
मलेशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, नवीन शोधमोहीम सुरू करण्यामागील उद्देश दुर्घटनेत प्रभावित झालेल्या कुटुंबियांना सांत्वन देण्याचा प्रयत्न आहे. या अपघातात जीवितहानी सोसलेल्या कुटुंबांना उत्तर देणे आमची जबाबदारी आहे, आणि नवीन शोधमोहीम त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
ओशन इनफिनिटी पुन्हा कामाला
शोधमोहीम आंतरराष्ट्रीय समुद्री अन्वेषण संस्था ओशन इनफिनिटी (Ocean Infinity) हाती घेणार आहे. ही कंपनी पूर्वीच्या विश्लेषणांवर आधारित त्या विशिष्ट समुद्री भागात शोध घेईल, जिथे MH370 च्या अवशेषांच्या सापडण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
मार्चमध्ये हवामानामुळे मोहीम थांबली होती
यावर्षी मार्चमध्ये शोधाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु हवामान आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे काही दिवसांतच ती स्थगित करावी लागली. पुढील काही महिन्यांच्या तयारीनंतर आता 30 डिसेंबरपासून शोध पुन्हा सुरू केला जाणार आहे.
जगभराचे लक्ष लागले
ही घटना जगभरातील तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि विमानन क्षेत्रातील अभ्यासकांसाठी आजही एक मोठे कोडे आहे. आता पुन्हा सुरू होणाऱ्या या मोहिमेतून काही ठोस पुरावे मिळावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.