मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन राहिलेला पठाण गॅंगचा मुख्य करीम लाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईतील या डॉनला भेटण्यासाठी येत होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात एकच वादळ उठलं आहे. पण आतापर्यंत मुंबईचा डॉन म्हणून केवळ दाऊद इब्राहिमच सगळ्यांना माहीत होता, तर हा करीम लाला कोण होता?

असे सांगितले जाते की, करीम लाला हा मुंबईतील पहिला डॉन होता. इतकेच नाही तर त्याने डी कंपनीचा मुख्य दाऊद इब्राहिमला बेक्कार धुतलं होतं. करीम लाला हा दुसरा प्रसिद्ध डॉन हाजी मस्तान याच्याही आधी मुंबईतील गुन्हे विश्वाचा मुख्य होता. त्याचं नाव होतंअब्दुल करीम शेर खान म्हणजेच करीम लाला.

कामासाठी अफगानिस्तानातून मुंबईत

करीम लाला हा मुळचा अफगानिस्तानमधील होता. तो एक पश्तून होता आणि २१ व्या वयात कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता. १९३० मध्ये पेशावरहून करीम लाला मुंबईत दाखल झाला होता. त्याने सुरूवातीला छोटे-मोठे काम केले, पण त्याचं मन त्यात रमलं नाही.
करीम लाला हा तसा घरचा श्रीमंत होतो, पण अधिक पैसे कमावण्यासाठी तो मुंबईत आला होता. त्यासाठी त्याने मुंबईत गुन्हेागारी विश्वात पाउल ठेवले. सर्वातआधी त्याने मुंबईतील ग्रान्ट रोडजवळ एक भाड्याच्या घरात सोशल क्लब नावाने जुगाराचा अड्डा सुरू केला. हा अड्डा बघता बघता मुंबईतील सर्वात मोठा जुगाराचा अड्डा झाला.

जुगाराचा अड्डा

(Image Credit : hindi.news18.com)

करीम लालाच्या या जुगाराच्या अड्ड्यावर मुंबईतील नामी लोक जुगार खेळायला येत होते. त्यामुळे करीम लालाची ओळख वाढली. जुगाराच्या क्लबनंतर करीम लालाने नंतर मुंबई पोर्टवर किंमती दागिने, सोनं, हिऱ्यांची तस्करी सुरू केली. स्वातंत्र्याआधी त्याने यातून बक्कळ पैसा कमावला. 

करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन वाद

मुंबईत त्या काळात करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन हे आपापलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मागे लागले होते. टोळ्यांमधील भांडणांमुळे तिघांनी काम आणि एरिया वाटून घेतला होता. याने तिघेही आपापल्या एरियात शांतपणे काम करू लागले.

पठाण गॅंगपासून दुरावा

वाढतं वय आणि बिघडत्या आरोग्यामुळे करीम लालाने पठाण गॅंगची जबाबदारी भाचा समद खानकडे दिली. तो नंतर हॉटेल आणि ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये शिरला. तो कायदेशीरपणे दोन हॉटेल आणि एक ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता. १९९५ मध्ये त्याला एका केसमध्ये अटकही करण्यात आली होती.

गरिबांना मदत

लाला दानही करत होता. हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियारप्रमाणे लाला गरिबांचा कैवारी अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झाला होता. दर आठवड्याला तो त्याचा दरबार भरवायचा. त्यात लोकांच्या तक्रारी, समस्या ऐकायचा. लोकांना तो पैशांचीही मदत करत होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्रातील पठाणांसाठी एक संघटना देखील सुरू केली. 

बॉलिवूड कनेक्शन

करीम लालाचं बॉलिवूड कनेक्शनही चांगलंच होतं. तो वेगवेगळ्या मोठ्या पार्ट्यांना जायचा. १९७३ मध्ये आलेल्या 'जंजीर' सिनेमातील शेर खानचं कॅरेक्टर करीम लालासोबत मिळत-जुळतं होतं. 

दाऊदला करीम लालाने धुतला होता

काही वर्षांनी मुंबई पोलीसचा हेड कॉन्स्टेबल इब्राहिम कासकरच्या दोन्ही मुलांनी म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर आणि शब्बीर इब्राहिम कासकरने हाजी मस्तानची गॅंग जॉइन केली. दोघांनी करीम लालाच्या हद्दीत तस्करीचा धंदा सुरू केला होता.करीम लाला या गोष्टीमुळे चांगलाच चिडला होता. त्यामुळे त्याने एकदा दाऊदला पकडून चांगलीच मारहाण केली होती. दाऊद त्यावेळी कसातरी आपला जीव वाचवून पळाला होता.

नंतर पुन्हा एकदा दाऊदने करीम लालाच्या हद्दीत तस्करीचा धंदा सुरू केला. पण यावेळी दाऊदला धडा शिकवण्यासाठी १९८१ मध्ये पठाण गॅंगने दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या केली. त्यानंतर दाऊदने करीम लालाचा भाऊ रहीम खान याची १९८६ मध्ये हत्या केली. हे सगळं असं सुरू होतं. पण दाऊद करीम लालाला ठार करू शकला नाही. अशात १९ फेब्रुवारी २००२ मध्ये करीम लालाचं मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं.
 

Web Title: Know who was Mumbai underworld don Karim Lala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.