भारतीय संशोधिकेची एक साधी साडी. रोजच्या वापरातली. त्यात असं काय विशेष? पण हीच साडी आज अमेरिकेच्या नामांकित वस्तुसंग्रहालयात मानाचं स्थान मिरवते आहे. भारताची आणि भारतीय अंतराळ संशोधनाची कीर्ती यामुळे सर्वदूर पसरते आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी. सी. येथील स्मिथसोनियनचं नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम हे अंतराळ मोहिमांशी संबंधित वस्तू आणि ऐतिहासिक विमानांसाठी प्रसिद्ध आहे. अंतराळ इतिहासातील अत्याधुनिक उपकरणांपासून ते अनेक महत्त्वाच्या गोष्टी इथे आहेत. त्याच वस्तूंमध्ये एक साधी साडी टांगलेली दिसते. अंतराळातील वस्तूंच्या दृष्टीनंही या साडीचं तसं काहीच वैशिष्ट्य नाही. कारण ही साडी कधीच पृथ्वीच्या वातावरणाबाहेर गेली नाही की अंतराळासाठी तिचा काही उपयोग नाही, पण ही साडी जी महिला नेसायची, ती मात्र भारताच्या आणि अंतराळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. कोणाची आहे ही साडी? -भारताच्या आणि इस्रोच्या प्रसिद्ध ‘रॉकेट वुमन’पैकी एक असलेल्या नंदिनी हरिनाथ यांची ही साडी आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेत त्यांची आणि त्यांच्या नेतृत्वातील मोहिमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नंदिनी हरिनाथ यांची निळ्या आणि लाल रंगाची ही साडी स्मिथसोनियनच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरीत्या गेलं आणि मंगळाच्या ३०० दिवसांच्या प्रवासाला निघालं, त्या दिवशी त्यांनी ही साडी परिधान केली होती’, असं स्मिथसोनियननं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे, ‘रॉकेट शास्त्रज्ञ आणि मंगळयान मोहिमेच्या सब-ऑपरेशन्स संचालक म्हणून हरिनाथ यांनी मोहिमेचं नियोजन आणि संचालन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सहा ते दहा महिन्यांच्या अपेक्षित कालावधीपेक्षा खूप जास्त काळ, म्हणजे तब्बल आठ वर्षे हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत राहिलं. या यशामुळे भारत मंगळावर पोहोचणारा पहिला आशियाई देश आणि जगातील चौथा देश ठरला. मोहिमेतील महिला नेतृत्वांनी नेसलेल्या साड्या भारताची राष्ट्रीय ओळख आणि अंतराळ क्षेत्रातील यशाचं प्रतीक बनल्या, असंही त्यात गौरवानं नमूद केलं आहे. ही साडी म्हणजे भारतीय महिलांनी अंतराळाच्या संदर्भात केलेल्या अजोड कार्याचं प्रतीक आहे, म्हणूनच या साडीचं महत्त्व अपरंपार! संग्रहालयानं सुंदर नक्षीकाम असलेली लाल-निळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या मॅनिक्विनचा फोटो आणि व्हिडीओही शेअर केला आहे.
नंदिनी हरिनाथ यांचा जन्म आणि संगोपन भारतात झालं. त्यांची आई गणिताची शिक्षिका होती, तर वडील अभियंता होते. इस्रोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. भारतीय अंतराळ संस्थेतील २० वर्षांहून अधिक कारकिर्दीत त्यांनी १४ पेक्षा जास्त मोहिमांमध्ये योगदान दिलं आहे. पूर्वी ‘स्टार ट्रेक’ नावाची एक लोकप्रिय मालिका टीव्हीवर चालायची, त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली होती.
Web Summary : Indian rocket scientist Nandini Harinath's sari, worn during the successful Mars Orbiter Mission, is now displayed at the Smithsonian's National Air and Space Museum. It symbolizes India's space achievements and women's contributions to the field, marking a proud moment for the nation.
Web Summary : भारतीय रॉकेट वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ की साड़ी, जो मंगल ऑर्बिटर मिशन के दौरान पहनी गई थी, अब स्मिथसोनियन के राष्ट्रीय वायु और अंतरिक्ष संग्रहालय में प्रदर्शित है। यह भारत की अंतरिक्ष उपलब्धियों और महिलाओं के योगदान का प्रतीक है, जो देश के लिए एक गर्व का क्षण है।