३ पत्नींना सोबत ठेवायचंय...२ सवतींसोबत रहायला तयार नव्हती तिसरी पत्नी, पतीनं केलं विष प्राशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:10 IST2025-01-17T15:55:38+5:302025-01-17T16:10:58+5:30
व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तीन पत्नींमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी पती पोलिसांकडे गेला होता.

३ पत्नींना सोबत ठेवायचंय...२ सवतींसोबत रहायला तयार नव्हती तिसरी पत्नी, पतीनं केलं विष प्राशन!
एकापेक्षा जास्त लग्न करणारे भरपूर लोक समाजात आहेत. अशात दोन्ही पत्नींना वेगवेगळ्या घरात ठेवून पतीला संसाराचा गाडा हाकावा लागतो. दोन पत्नी एकत्र एकाच छताखाली राहतात असं कमीच बघायला मिळतं. तीन पत्नी असतील तर विषय अधिक गंभीर होतो. नंतर सतत भांडण आणि वाद आलेच. तीन बायका असलेल्या अशाच एका व्यक्तीची एक धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या रीवा शहरातून समोर आली आहे. इथे तिसऱ्या पत्नीनं सोबत राहण्यास नकार दिल्यानं पतीनं पोलीस स्टेशन परिसरातच विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तीन पत्नींमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी पती पोलिसांकडे गेला होता.
ज्ञानेंद्र पांडेय नावाच्या व्यक्तीनं एक दोन नाही तर तीन लग्न केली होती. पहिली पत्नी सुशीला पांडेय आणि दुसरी पत्नी सुनीता पांडेय पतीसोबत एकाच छताखाली राहत होत्या. तर तिसरी पत्नी सुमन साकेत वेगळ्या ठिकाणी राहत होती.
पत्नी सुमनचं म्हणणं आहे की, पती पांडेय तिची काळजी घेत नाहीत. त्यामुळे तिला वेगळं रहायचं आहे. याबाबत महिला पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी पती आणि त्याच्या पत्नींना समजावण्यासाठी बोलवलं होतं.
पांडेय आणि तिसरी पत्नी सुमन यांनी पोलीस स्टेशन बाहेर चर्चा केली. पण काही फायदा झाला नाही. पांडेय यांना तिसऱ्या पत्नीला गमवायचं नव्हतं. अशात जेव्हा तिसरी पत्नी सुमन दोन सवतींसोबत राहण्यास तयार झाली नाही, तेव्हा निराश झालेल्या पांडेय यानी विष प्राशन केलं.
पतीला बेशुद्ध बघून तिन्ही पत्नींना धक्का बसला. त्या आरडा-ओरड करत पोलिसांकडे गेल्या. त्यानंतर पांडेय यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
डीएसपी महिला प्रकोष्ठ प्रतिभा शर्मा यांनी सांगितलं की, ज्ञानेंद्र पांडेय याना तिन्ही पत्नीसोबत एकाच घरात रहायचं होतं. यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. तिसरी पत्नी यासाठी तयार नव्हती. पण ज्ञानेंद्रला तिला कोणत्याही स्थितीत सोडायचं नव्हतं.
पती आणि पत्नींमधील वाद सोडवण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच पांडेय यानी विष प्राशन केलं. त्याना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.