ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:44 IST2025-10-06T18:43:35+5:302025-10-06T18:44:02+5:30
नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास नकार दिल्याने लग्न मोडलं आहे. सोशल मीडियावर ही घटना जोरदार व्हायरल होत आहे.

ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
हुंडा दिला नाही म्हणून अनेकदा लग्न मोडतात. अशातच आता एक अजब घटना समोर आली आहे. नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास नकार दिल्याने लग्न मोडलं आहे. सोशल मीडियावर ही घटना जोरदार व्हायरल होत आहे. लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण नवरदेवाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, तर काही जण सासऱ्याने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत.
एका रेडिट युजरने ही गोष्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने स्पष्ट केलं आहे की, त्याच्या चुलत भावासोबत ही अजब घटना घडली आहे. "माझा भाऊ एक समजूतदार आणि कमावता मुलगा आहे. त्याला एक लग्नाचा चांगला प्रस्ताव आला. दोघंही एकमेकांना आवडले आणि दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शवली, मात्र ऐनवेळी हुंड्यामुळे नातं तुटलं."
"मुलीच्या वडिलांनी वारंवार हुंडा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गिफ्ट म्हणून रेंज रोव्हर किंवा डुप्लेक्स फ्लॅट देण्याबाबतही म्हटलं, पण माझ्या भावाने प्रत्येक वेळी नकार दिला. शेवटी, मुलीच्या वडिलांनी हे नाते तोडलं आणि थेट लग्नच मोडलं. जर नवरदेव हुंडा घेत नसेल तर त्याच्यात काहीतरी कमतरता असेल असे मुलीचे वडील म्हणाले" असं युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने मलाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं. "मुलीचे कुटुंबीय लवकर लग्न करण्याची मागणी करत होते. पण मला समजून घ्यायला थोडा वेळ हवा होता. तेव्हा त्यांनी त्यांची संपत्ती दाखवायला, सांगायला सुरुवात केली. तेव्हाच मी समजलो की हा रेड फ्लॅग आहे" असं युजरने म्हटलं आहे.