एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:58 IST2026-01-09T12:43:28+5:302026-01-09T12:58:28+5:30
जगाच्या नकाशावर असा एक देश आहे जिथे सोन्याची किंमत तुमच्या सकाळच्या चहा-नाश्त्यापेक्षाही कमी आहे.

एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
भारतात सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले असून १० ग्रॅमसाठी ग्राहकांना सव्वा लाखांहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, जगाच्या नकाशावर असा एक देश आहे जिथे सोन्याची किंमत तुमच्या सकाळच्या चहा-नाश्त्यापेक्षाही कमी आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाया देशात सध्या सोन्याचे गणित पूर्णपणे उलटे झाले आहे. येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ऐकला, तर तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही.
एक कप चहा आणि १ ग्रॅम सोनं... किंमत सारखीच!
भारतात सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम सुमारे १३,८०० ते १३,९०० रुपयांच्या आसपास आहे. याउलट, व्हेनेझुएलामध्ये याच २४ कॅरेट सोन्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये केवळ १८१ रुपये प्रति ग्राम इतकी आहे. इतकेच नाही तर २२ कॅरेट सोने तर अवघ्या १६६ रुपयांत मिळतेय. म्हणजेच, भारतात जितक्या पैशात आपण दुध-ब्रेडचे पाकीट किंवा हॉटेलमध्ये एक कप चहा पितो, तितक्या किमतीत व्हेनेझुएलामध्ये चक्क १ ग्रॅम शुद्ध सोने खरेदी करता येते.
सोनं इतकं स्वस्त का?
वेनेझुएलामध्ये सोने स्वस्त असणे हे तिथल्या आर्थिक सुबत्तेचे लक्षण नसून, उलट तिथल्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे भीषण वास्तव आहे. या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाचे चलन 'बोलिव्हर' कमालीचे घसरले आहे. महागाई इतकी वाढली आहे की, चलनाची किंमत कागदाच्या तुकड्यासारखी झाली आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या काळात देशाचे कर्ज फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वापरला गेला. २०१३ ते २०१६ दरम्यान सुमारे ११३ मेट्रिक टन सोने स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले. तर, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि अंतर्गत भ्रष्टाचारामुळे देशातील सोन्याचे अधिकृत दर जागतिक दरांच्या तुलनेत पूर्णपणे कोलमडले आहेत.
संपत्ती असूनही देश कंगाल!
व्हेनेझुएला हा नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत श्रीमंत देश आहे. जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा याच देशाकडे आहे. इतकेच नाही तर येथील 'ओरिनोको मायनिंग आर्क' भागात तब्बल ८,००० टन सोने आणि इतर खनिजे असल्याचा दावा केला जातो. मात्र, चुकीची धोरणे आणि राजकीय अस्थिरतेमुळे आज या देशात सोनं मातीमोल झालं असून, सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे.