इतर गाड्यांसारखा विमानालाही असतो हॉर्न, पण ना ट्रॅफिक, ना काही मग हॉर्न असतो तरी कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:15 IST2026-01-10T15:14:53+5:302026-01-10T15:15:42+5:30
Airplane Horn Interesting Facts : विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. पण मग असा प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण...

इतर गाड्यांसारखा विमानालाही असतो हॉर्न, पण ना ट्रॅफिक, ना काही मग हॉर्न असतो तरी कशाला?
Airplane Horn Interesting Facts : एखादं वाहन चालवताना हॉर्न किती महत्वाचा असतो हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. कार असो, बाइक असो किंवा आणखी काही हॉर्न महत्वाचाच असतो. जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता यावी. हॉर्नचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तुम्ही ऐकले असतील. रेल्वे सुद्धा प्लॅटफॉर्महून निघताना, थांबताना हॉर्न वाजवते. पण आपण कधी विमानात असलेल्या हॉर्नबाबत ऐकलंय का? अनेकांना हे माहीत नसतं की, विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. पण मग असा प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण...
का असतो विमानाला हॉर्न?
सामान्यपणे समोरच्या गाडीला इशारा देण्यासाठी किंवा साइड मागण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. पण विमानातील हॉर्नचं असं काही काम नसतं. कारण एकाच रूटवर दोन विमाने समोरासमोर येण्याची शक्यता फार कमी असते. त्याशिवाय विमानातील हॉर्नचा वापर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा केला जात नाही.
मुळात विमानातील हॉर्नचा वापर ग्राउंड इंजिनिअर आणि स्टाफसोबत संपर्क करण्यासाठी केला जातो. जर विमानात उड्डाण घेण्याआधी काही गडबड झाली असेल किंवा एखादी इमरजन्सीसारखी स्थिती आली असेल तेव्हा विमानाचे पायलट हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनिअर अलर्ट मेसेज देतात.
कुठं लावला असतो हॉर्न?
विमानातील हॉर्न लॅंडिंग गिअरच्या कम्पार्टमेंटमध्ये लावलेला असतो आणि याचं बटन विमानाच्या कॉकपिटमध्ये असतं. या बटनावर जीएनडी असं लिहिलेलं असतं. हे बटन दाबल्यावर विमानाचं अलर्ट सिस्टीम चालू होतं आणि यातून सायरनसारखा आवाज येतो.
विमानातील ऑटोमॅटिक हॉर्नच्या आवाजात का असतो फरक?
विमानात ऑटोमॅटिक हॉर्नही लावलेले असतात, जे सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यावर किंवा आग लागल्यावर आपोआप सुरू होतात. याची खास बाब म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो. सिस्टीममध्ये काय बिघाड झालाय त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारे वाजतात. या आवाजावरून एअरक्राफ्ट इंजिनिअरला हे समजतं की, विमानातील कोणत्या भागात बिघाड झाला आहे.