आता माझी सटकली.... वनविभागाच्या जीपवरील कर्णकर्कश हॉर्नमुळे हत्तीला जेव्हा राग येतो... कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:47 PM2020-05-11T15:47:29+5:302020-05-11T15:50:28+5:30

तामिळनाडू वनविभागाच्या जीपवरील कर्णकर्कश हॉर्नमुळे हत्तीचा पारा चांगलाच चढला. हत्तीने मग वनविभागाच्या या जीपवरच आपला सगळा राग काढला.

Elephant got angry because of Tamilnadu forest department jeep’s horn-SRJ | आता माझी सटकली.... वनविभागाच्या जीपवरील कर्णकर्कश हॉर्नमुळे हत्तीला जेव्हा राग येतो... कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम

आता माझी सटकली.... वनविभागाच्या जीपवरील कर्णकर्कश हॉर्नमुळे हत्तीला जेव्हा राग येतो... कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम

Next

आपल्या आजूबाजूला अनेकदा आपण वाचलं असेल, पाहिलंही असेल की विनाकारण हॉर्न वाजवू नका.. तरीही वाहनचालक कोणत्याही कारणाशिवाय जोरजोरात हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होतेच, शिवाय कानाचे विकारही होऊ शकतात. याबाबत अनेकदा जनजागृती करुनही कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे माणसाला एखादी सवय लागली ती तशीच राहते. मग शहरातील रस्त्यावर वाहन चालवणं असो, गावातील असो किंवा मग इतर कोणत्याही भागातील रस्ते.. मात्र अशाच विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना एका हत्तीनं चांगलीच अद्दल घडवलीय. तामिळनाडू वनविभागाच्या जीपवरील कर्णकर्कश हॉर्नमुळे हत्तीचा पारा चांगलाच चढला. हत्तीने मग वनविभागाच्या या जीपवरच आपला सगळा राग काढला. हत्तीने जीपचे मोठी नासधूस केली आणि हे पाहून जीपमधील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. इंडियन फॉरेस्ट सर्विसचे ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तामिळनाडूच्या थडगाम क्षेत्रात ही घटना घडलीय. वनविभागाची एक टीम जीपमधून जंगलात फेरफटका मारत होती. मात्र त्यावेळी या जीपचा हॉर्न मोठमोठ्याने वाजवला जात होता. हॉर्न वाजू लागताच जंगलातील एका हत्तीचा राग अनावर झाला. कसलाच विचार न करता हा हत्ती जीपच्या दिशेने धावू लागला. हत्तीचा हा आवेश पाहून जीपमधील वनविभाग कर्मचाऱ्यांची जणू बोबडीच वळली. त्यांनी जीप मागच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. तरीही हत्ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने मागे वळणाऱ्या जीपचाही पाठलाग सुरुच ठेवला आणि जीपच्यावर जोरजोरात हल्ला करण्यास सुरुवात केली. हत्तीचा क्रोध अनावर झाला होता. त्याच्या या रागाने जीपच्या बोनेटचा अक्षरशा चक्काचूर केला. कारण त्याच ठिकाणाहून हॉर्नचा मोठमोठा आवाज येत होता.

जीपमध्ये बसलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार करुन हत्तीला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्ती काही ऐकतच नव्हता. यानंतर अखेर जीव वाचवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीपमधून उतरुन पोबारा केला आणि दूरुनच हवेत गोळीबार केला. त्यानंतर हत्तीचा राग शांत झाला आणि तो जंगलाच्या दिशेने परतला. 

हा व्हीडिओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी म्हटलंय की, वन्यजीवन केवळ सुंदर नाही तर अनेकदा तिथले वन्यजीव आपल्याला जीवनाचा धडा शिकवून जातात. तामिळनाडूच्या थडगाम क्षेत्रात ही घटना घडलीय. ही तामिळनाडू वनविभागाची जीप होती. त्यांनी पुढे म्हटलंय की जीपच्या बोनेटवर असलेला आणि कर्णकर्कशरित्या वाजणारा हॉर्नच हत्तीच्या संतापाचं कारण असू शकतं.

सुशांत नंदा यांनी 10 मे रोजी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या  व्हीडिओला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर अनेकांकडून या व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. शिवाय अनेकांनी सुशांत नंदा यांचं हे ट्विट रिट्विटसुद्धा केलंय.

Web Title: Elephant got angry because of Tamilnadu forest department jeep’s horn-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.