भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:24 IST2026-01-13T14:23:52+5:302026-01-13T14:24:32+5:30
वू आणि वांग यांची भेट शाळेत झाली. त्यानंतर दोघांनी एकाच विद्यापीठात प्रवेश घेतला आणि २०१५ मध्ये ते रिलेशनशिपमध्ये आले. अनेक वर्षे त्यांचं रिलेशनशिप सुरू होतं.

फोटो - zeenews
चीनच्या शान्शी प्रांतातील शियान शहरात राहणाऱ्या 'वू' नावाच्या महिलेने २०१६ मध्ये एक अनोखा निर्णय घेतला होता. तिने आपल्या बॉयफ्रेंडसाठी १९९ युआन (जवळपास २५०० रुपये) खर्च करून एक 'लव्ह इन्शुरन्स' पॉलिसी खरेदी केली होती. त्यावेळी कदाचित कोणालाही वाटलं नसेल की, हा निर्णय १० वर्षांनंतर चर्चेचा विषय ठरेल आणि लग्नानंतर त्यांना मोठी रक्कम मिळवून देईल.
वू आणि वांग यांची भेट शाळेत झाली. त्यानंतर दोघांनी एकाच विद्यापीठात प्रवेश घेतला आणि २०१५ मध्ये ते रिलेशनशिपमध्ये आले. अनेक वर्षे त्यांचं रिलेशनशिप सुरू होतं. २०२५ मध्ये त्यांनी लग्न रजिस्टर केलं. ही पॉलिसी 'चायना लाइफ प्रॉपर्टी अँड कॅज्युअल्टी इन्शुरन्स' कंपनीची होती. या पॉलिसीची मूळ किंमत २९९ युआन होती, परंतु वूने ती सवलतीत १९९ युआनमध्ये खरेदी केली होती.
अशी होती पॉलिसीची अट
या पॉलिसीची अट अशी होती की, पॉलिसी सुरू झाल्याच्या तिसऱ्या वर्षापासून पुढील १० वर्षांच्या आत जर या कपलने लग्न केलं, तर त्यांना १०,००० गुलाब किंवा ०.५ कॅरेटचा हृदयाच्या आकाराचा हिरा मिळेल.
बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया काय होती?
वांगने कबूल केले की, सुरुवातीला त्याचा या पॉलिसीवर अजिबात विश्वास नव्हता. त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडची फसवणूक झाली आहे. त्याला वाटलं की हा एखादा 'स्कॅम' आहे, परंतु काळाने हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. ऑक्टोबर २०२५ मध्ये लग्न रजिस्टर झाल्यानंतर या पॉलिसीवर दावा करण्यात आला. तोपर्यंत कंपनीने हे उत्पादन बंद केलं होतं, परंतु जुन्या पॉलिसीधारकांना क्लेम करण्याची परवानगी होती.
गुलाबांऐवजी स्वीकारले पैसे
या जोडप्याने १०,००० गुलाबांऐवजी १०,००० युआन (सुमारे १ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त) रोख रक्कम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वू म्हणाली की, लग्नानंतर इतके गुलाब सांभाळणं अवघड झालं असतं. सोशल मीडियावर ही गोष्ट जोरदार व्हायरल झाली आहे. एका युजरने म्हटलं की, "आम्ही कॉलेजमध्ये भेटलो आणि अनेक वर्षे एकत्र राहिलो, तरीही आम्हाला अशा पॉलिसीबद्दल माहिती नव्हती." सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.