सुरवाडे उपकेंद्रावर ४५ वर्षांखालील लोकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:40+5:302021-05-26T04:17:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्य:स्थितीत राज्यभर शासकीय यंत्रणेत केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून, बोदवड ...

Vaccination of people below 45 years of age at Surwade sub-center | सुरवाडे उपकेंद्रावर ४५ वर्षांखालील लोकांना लसीकरण

सुरवाडे उपकेंद्रावर ४५ वर्षांखालील लोकांना लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्य:स्थितीत राज्यभर शासकीय यंत्रणेत केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून, बोदवड तालुक्यातील सुरवाडे उपकेंद्रात नियमबाह्यरीत्या ४५ वर्षांखालील नागरिकांना लस दिल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत यादीचे पुरावे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देऊन कारवाईची मागणी केली आहे.

कोरोनाचे नियम पाळताना मोठ्या कार्यक्रमांना, उद्घाटनांना बंदी असताना येवती आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सुरवाडे उपकेंद्रात लसीकरणाचे राजकीय स्टाईल उद्घाटन करण्यात आले. तर दुसरीकडे ज्येष्ठ, वयोवृद्धांना डावलून ४५ वयोगटाखालील नागरिकांना कोविशिल्डचे डोस देण्यात आले. त्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लाभार्थ्यांना लस दिली गेल्याचे प्रा. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, सरपंच तसेच अन्य सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असून, या वेळी नियमांचा भंग झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ठोस कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा प्रा. पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Vaccination of people below 45 years of age at Surwade sub-center