जामनेर तालुक्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:19 IST2018-06-28T13:16:55+5:302018-06-28T13:19:56+5:30
वनविभागाकडून गुप्तता

जामनेर तालुक्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
तोंडापूर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील ढालशिंगी शिवारात एका नाल्याच्या कडेला बुधवारी संध्याकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बाबत वनविभागाकडून गुप्तता पाळण्यात येऊन गुरुवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेतात काम करीत असलेल्या मजुरांना नाल्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्यांनी शेतमालक सचिन पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी वनविभागास कळविले. त्यावेळी घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी पोहचले व रात्रभर तेथे थांबून सकाळी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १४ ते १५ वर्षाचा हा बिबट्या असावा, असे सांगितले जात असून कुजलेल्या अवस्थेत तो आढळून आला.
या बाबत वनविभागाने गुप्तता पाळली होती. मात्र याची कुणकूण लागताच सकाळी पत्रकारांसह काही जण घटनास्थळी पोहचले.