खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 06:00 PM2020-06-03T18:00:03+5:302020-06-03T18:01:18+5:30

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे : जळगाव येथे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चेत आवाहन

Private hospitals should be started immediately | खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत

खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत

Next

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यू दर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सहकार्य करुन टास्क फोर्ससाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री टोपे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज सकाळी नियोजन भवनात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. एन. एस. चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई
मंत्री श्री. टोपे म्हणाले, सेवाभाव सर्वांत महत्वाचा आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करीत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. त्यासाठी आयएमएला दोन हजार पीपीई कीट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी फिजिशियन्स व इन्सेन्टीव क्षेत्रातील किमान तीन- तीन तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना वेतन सुध्दा अदा करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा. तसेच जे खासगी रुग्णालये सुरू होणार नाहीत त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी, असेही निर्देश मंत्री टोपे यांनी दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सध्या खासगी रुग्णालये सुरू होण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सामाजिक भावना जोपासत आपापली रुग्णालये सुरू करावीत, असेही आवाहन केले. खासगी रुग्णालये उद्यापासून सुरू केली जातील, असे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिले.

Web Title: Private hospitals should be started immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.