Office of Gram Panchayats to be inspected | ग्रामपंचायतींची होणार दफ्तर तपासणी
ग्रामपंचायतींची होणार दफ्तर तपासणी

जळगाव- ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी तसेच कामकाजातील गैरप्रकार शोधून काढण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची दफ्तर तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटनिहाय गटाच्या मुख्यालयात कॅम्प लावण्यात येणार असून त्याठिकाणी ग्रामपंचायतीच्या सर्व योजनांचे दफ्तर बोलविण्यात येऊन ते तपासले जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिली.
१३ नोव्हेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून २७ डिसेंबरपर्यंत दफ्तर तपासणीचा कार्यक्रम चालणार आहे. दफ्तर तपासणीसाठी तालुकानिहाय गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात आले आहे. पथकाने सर्व ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण करून चार दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या मुद्यांवर होईल तपासणी
ग्रामपंचायतींच्या कामात हिशोबाचे लेखे १ ते ३३ नमुन्यात न ठेवणे, अधिसूचनेप्रमाणे कर आकारणी न करणे, कराचे वसुली व थकबाकीचे तेरीज न काढणे, मासिक व ग्रामसभेचे इतिवृत्त नोंदवह्या अपूर्ण ठेवणे, सर्व नमुने अद्ययावत न ठेवणे, ग्रामपंचायत पाणी पुरवठा तसेच वीज बिलात अनियमितता, लेखा परीक्षण अहवालाचे वाचन ग्रामसभेत न करणे आदी गंभीर प्रकार ग्रामपंचायतींच्या तपासणीत दरवर्षी समोर येत असतात. आता होणाऱ्या तपासणीत हे मुद्दे आढळून आल्यास संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाने दिली.

संपर्क प्रमुखांकडे अहवाल पाठवा
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दफ्तर तपासणीसाठी पथक नेमण्यात येणार आहे. या पथकात सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, सहायक लेखा अधिकारी यांचा समावेश असणार आहे. हे पथक प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गटातील सर्व ग्रामपंचायतीचे दफ्तर तपासणी करणार आहे. दफ्तर तपासणीनंतर अहवाल संपर्क प्रमुखांकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. संपर्क प्रमुख म्हणून तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Office of Gram Panchayats to be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.