भिंतीवरच्या 'त्या' फोटोने केला घात! ५० लाखांच्या विम्यासाठी रचला बनाव; पोलिसांचा अन् पत्नीचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:58 IST2026-03-10T15:51:19+5:302026-03-10T15:58:33+5:30
जळगावात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे लाटण्यासाठी कुटुंबियांनी धक्कादायक कट रचल्याची घटना समोर आली आहे.

भिंतीवरच्या 'त्या' फोटोने केला घात! ५० लाखांच्या विम्यासाठी रचला बनाव; पोलिसांचा अन् पत्नीचा प्लॅन
Jalgaon Crime: चित्रपटालाही लाजवेल असा एक थरारक आणि तितकाच संतापजनक विम्याचा घोटाळा जळगावपोलिसांनी उघडकीस आणला आहे. एका व्यक्तीच्या नैसर्गिक मृत्यूला चक्क भीषण अपघाताचे रूप देऊन विमा कंपन्यांना साडेसात कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न मेहुणबारे पोलिसांनी हाणून पाडला. महत्त्वाचे म्हणजे, या गुन्हेगारी कटात खाकी वर्दीतील चार पोलीस कर्मचारी आणि एक वैद्यकीय अधिकारी सामील असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी राजेंद्र शालिंदर जाधव यांचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या विमा पॉलिसीची रक्कम लाटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विमा एजंट आणि सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली.
बनावट अपघाताचा असा रचला सेट
नैसर्गिक मृत्यू होऊन वर्ष उलटल्यानंतर, १९ एप्रिल २०२५ रोजी राजेंद्र जाधव यांचा चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला. धक्कादायक म्हणजे, समोर मृतदेह नसतानाही चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर यांनी चक्क पोस्ट मॉर्टम रिपोर्ट तयार करून दिला. मेहुणबारे आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी या खोट्या अपघाताचा पंचनामा केला, कागदपत्रे बनवली आणि थार गाडीने धडक दिल्याची खोटी नोंद डायरीत केली.
एका फोटोने आणि सतर्क अधिकाऱ्याने समोर आणलं सत्य
मृताच्या पत्नीने ५० लाखांच्या विम्याचा दावा केल्यानंतर विमा कंपनीला संशय आला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा जाधव यांच्या घरी भेट दिली, तेव्हा भिंतीवर लावलेल्या त्यांच्या फोटोने सत्य बाहेर काढले. त्या फोटोवर मृत्यची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी स्पष्ट लिहिलेली होती. तपासात असेही आढळले की, जाधव यांच्या नावावर वेगवेगळ्या १० कंपन्यांच्या सुमारे साडेसात कोटींच्या पॉलिसी होत्या. हा सर्व प्रकार उघड होताच विमा कंपनीचे अधिकारी किरण शिंदे यांनी तक्रार दाखल केली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई करत खालील नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, पोलीस कर्मचारी सचिन निकम, रवींद्र बत्तीसे, महेंद्र पाटील, सुनील निकम, विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील, प्रेम पाटील, मृताचे नातेवाईक अरुणा जाधव (पत्नी), मिथुन जाधव (भाऊ) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी केवळ हा एकच गुन्हा केला आहे की अशाच प्रकारे इतरही मृतदेहांचा बाजार मांडून विमा कंपन्यांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.