मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:47 PM2022-07-01T17:47:14+5:302022-07-01T17:47:21+5:30

Jalgaon Politics : जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

Maharashtra Political Crisis Jalgaon Politics Gulabrao Patil, Kishor Patil And Chimanrao Patil | मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

googlenewsNext

प्रशांत भदाणे

जळगाव - राज्यात ठाकरे सरकार कोसळलं. आता एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि भाजपचं नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीही झाला. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली. मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार? याचेही अंदाज लावले जाताहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडात खरा जोर लावला, तो जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी. जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

शिंदे सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे हमखास येतील, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहरबानी दाखवलीच, तर एक राज्यमंत्रिपदही जळगावच्या पदरात वाढून मिळू शकते. भाजपचे नेते गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जातं आहे. जिल्ह्यात एकाचवेळी तीन मंत्रिपदे राहण्याचीही शक्यता आहे. युती सरकारमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे होती तर गुलाबराव पाटलांकडे राज्यमंत्रिपद होतं. हाच फॉर्म्युला आताही कायम असण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेत मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी फाईट असेल. चिमणराव पाटील हे सेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी तीनवेळा शिवसेनेचे विधानसभेत नेतृत्व केलंय. जिल्ह्यात मराठा समाजाचा एकही मंत्री नसल्याने त्यांना संधी मिळू शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची संधी गुलाबराव पाटलांनी हिरावून घेतली होती. त्यामुळं आता त्यांच्या नावाचा विचार होईल, असं सांगितलं जातंय. आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं त्यांचंही पारडं जड आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत गेले असले तरी खडसेंना शह देण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते. पण ही शक्यता खूपच कमी आहे.

नव्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे असेल, याचीही चर्चा आहे. भाजपच्या काळात हे पद गिरीश महाजनांकडं होतं. तर ठाकरे सरकारमध्ये गुलाबराव पाटलांकडे पालकमंत्री पद होतं. आगामी काही महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका असल्याने, गिरीश महाजन यांच्यावर नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचं पालकमंत्रीपद कायम राहू शकते. मात्र गिरीश महाजन नाशिकसह जळगावसाठी देखील आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे सरकारचा पूर्ण होल्ड भाजपकडे असल्याची चर्चा असल्याने जळगावचं पालकमंत्री पद भाजप सोडेल का? हा प्रश्न आहे. 
 

Web Title: Maharashtra Political Crisis Jalgaon Politics Gulabrao Patil, Kishor Patil And Chimanrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.