Jalgaon: अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:12 IST2025-11-28T17:11:32+5:302025-11-28T17:12:52+5:30
एका गावात २६ रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. यासाठी बाहेरगावांहून काही मंडळी आली होती. त्याच वेळी सकाळी एका घरातील ११ वर्षीय मुलगी दिसत नव्हती.

Jalgaon: अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ...
Jalgaon Crime : भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ११ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अवघ्या काही तासांतच मुलीची छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजजवळ बसमधून सुटका करण्यात आली. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना एरंडोल तालुक्यातील एका गावात बुधवारी घडली.
एका गावात २६ रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. यासाठी बाहेरगावांहून काही मंडळी आली होती. त्याच वेळी सकाळी एका घरातील ११ वर्षीय मुलगी दिसत नव्हती. तिचा शोध सुरू झाला. त्याच वेळी एक पाहुणाही दिसत नव्हता, यामुळे संशय बळावला. शोधाशोध सुरू झाली.
सकाळी नऊ ते दहा वाजेदरम्यान त्या संशयित नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क झाला. त्या वेळी मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. ती परभणीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली असल्याचे तिने सांगितले, तेवढ्यात तिकडून फोन कट करण्यात आला व नंतर फोन स्विचऑफ झाला. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या परिवारातील काही लोक कासोदा पोलिस ठाण्यात पोहोचले.
अशी फिरली तपासचक्रे
सहायक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत यांना घटनाक्रम सांगितला. संशयिताचा मोबाइल बंद असल्याने पोलिसांना लोकेशन मिळत नव्हते. पोलिसांनी तपासचक्रे गतीमान करत छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांशी संपर्क साधला. तेथील ओळखीच्या अधिकाऱ्यांना परभणीकडे जाणाऱ्या बसमध्ये मुलीचा शोध घेण्याची विनंती केली; पण तोपर्यंत ही बस स्थानक सोडून निघून गेली होती.
वाळूजजवळील टोल नाक्यावर पोलिसांनी बसमधील प्रवाशांची चौकशी सुरू केली, त्यावेळी एका बसमध्ये ही अल्पवयीन मुलगी आढळली. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील नातेवाइकांना बोलावून या मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलीचा शोध लागल्याने या परिवाराचा जिवात जीव आला. दरम्यान, मुलीला विनापरवानगी घेऊन जाणा-या पाहुण्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.