जळगावात गरम पाण्याने भाजल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; 'कांदेपोहे' खाण्याचा हट्ट जीवावर बेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:26 IST2025-11-14T15:25:35+5:302025-11-14T15:26:34+5:30
जळगावात एका चिमुकल्याचा अंगावर गरम पाणी पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

जळगावात गरम पाण्याने भाजल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; 'कांदेपोहे' खाण्याचा हट्ट जीवावर बेतला
Jalgaon Accident: जळगावातील वाटिका आश्रम परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरी खेळत असताना अचानक अंगावर गरम पाणी पडून गंभीररित्या भाजल्यामुळे एका चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता या निष्पाप मुलाने अखेरचा श्वास घेतला.
चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटिका आश्रम, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील जितेंद्र पाटील हे एस.टी. वर्कशॉपमध्ये कामाला आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय घडली?
आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. चेतन घरी खेळत असताना त्याने आपल्या आईकडे कांदेपोहे खाण्याचा हट्ट केला होता. मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याची आई पोहे तयार करण्याच्या तयारीला लागली आणि कांदे कापत होती. दरम्यान, चेतन खेळता खेळता अचानक बाथरूममध्ये गेला. याचवेळी बाथरूममध्ये एका बादलीत गरम पाणी ठेवलेले होते. खेळताना चेतनच्या अंगावर ते गरम पाणी पडले. गरम पाण्यामुळे चेतन गंभीररित्या भाजला गेला आणि त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू
गेले काही दिवस चेतनवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, भाजल्यामुळे त्याच्या जखमा गंभीर बनल्या होत्या आणि त्याची प्रकृती सतत चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान बुधवारी दुपारी ३ वाजता चेतनची प्राणज्योत मालवली.