अफेअरची माहिती घरच्यांनी दिली; १६ वर्षाच्या मुलीने तरुणाच्या खुनाची चिथावणी दिली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:44 IST2025-09-27T20:44:22+5:302025-09-27T20:44:22+5:30
जळगावात एका तरुणाच्या हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

अफेअरची माहिती घरच्यांनी दिली; १६ वर्षाच्या मुलीने तरुणाच्या खुनाची चिथावणी दिली अन्...
Jalgaon Crime: जळगावच्या यावल तालुक्यातील २१ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. मयत तरुणाने तिच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या पालकांना दिली होती. या रागातून तिनेच संशयितांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी नागपुरातील असून प्रेमप्रकरणातून ती जळगावात अनेकदा आली होती.
इम्रान युनूस पटेल (२१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या खुनानंतर ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) हे दोघे स्वतःहून पोलिसात हजर झाले. पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यात तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (वय १९) यांच्या सहभागाचीही पुष्टी झाली.
याबाबत पोलिसांनी नागपूर येथील एका अल्पवयीन मुलीची चौकशी केली होती. त्यानंतर या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे संशयाने पाहिले गेले. तपासादरम्यान तिच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या प्रेमसंबंधांची माहिती इम्रान याने तिच्या पालकांना दिली होती. तिनेच वरील दोघांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
या बालिकेची बाल अधिरक्षागृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल महाजन करत आहेत.