जळगाव : बनावट तंबाखूची तस्करी करणाऱ्या सनी टेकचंद पंजाबी (वय ३२, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यास एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी इच्छादेवी चौकात पकडले. त्याच्या चारचाकीत सव्वा लाख रुपये किमतीचा तंबाखूचा साठा आढळून आला. सनी पंजाबी याला अटक करण्यात आली आहे.
सनी पंजाबी हा बनावट तंबाखूची तस्करी करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, गणेश शिरसाळे, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी इच्छादेवी चौकात नाकाबंदी करून रिक्षा (क्र. एमएच १९ सीवाय ००८९) अडविली. तपासणी केली असता रिक्षात बनावट तंबाखूची पाकिटे आढळून आली. त्याची किंमत सव्वा लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कंपनीचे मार्केटिंग सुपरवायझर अशोक बाबूराव महाजन (वय ६३, रा. अमळनेर) यांना बोलावून घेत तपासणी केली. महाजन यांच्याच फिर्यादीवरून पंजाबी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
--