जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 08:56 IST2025-09-16T08:48:04+5:302025-09-16T08:56:28+5:30
Jalgaon Rain Alert: जळगाव तालुक्यातील पाचोरामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली गेली.

जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
-श्याम सराफ/उत्तमराव मनगटे, पाचोरा
पाचोरा ( जि. जळगाव) तालुक्यातील घाट माथ्यावर सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे असून, नदीकाठच्या शेतांमधील पिके वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
वरखेडी येथील बहुळा नदीला मोठा पुर आला आहे. नदीकाठच्या शेताचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे, शिंदाड व डोंगर माथ्यावरील ढगफुटी सदृश्य पावसाने शिंदाड, वडगाव कडे, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे पिंप्रि या भागात मोठे नुकसान नुकसान झाले आहे.
नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसून खूप मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमधील पिके वाहून शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निभोरा येथील नदीचे पाणी
पाचोरा ( जि. जळगाव) तालुक्यातील घाट माथ्यावर सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. निभोरा येथे नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले. #maharashrarain#jalgaon#rainspic.twitter.com/EGrOBT78Hm
— Lokmat (@lokmat) September 16, 2025
पाचोरा शहरापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर असा पूर आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक गावांमध्ये ग्रामस्थ रात्रभर झोपलेच नाही. मिळेल तेथे आश्रय घेऊन ग्रामस्थांनी रात्र काढली.
खानदेश आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला
सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) : सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खानदेश आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे.
सातगाव डोंगरी, सार्वे या गावातून पाचोरा येण्यासाठी संपर्क तुटला आहे. सातगावपासून चार किलोमीटरवर असलेल्या पिंप्री गावात महापुराचे पाणी घुसताना गाव थोडक्यात बचावले. सातगाव डोंगरी आणि पिंप्रीचे नागरिक सोमवारी रात्री दोन वाजेपासून जागी आहेत.
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदाड मंडळातील 15 गावातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.