Better an enemy than a deceitful friend! | कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली. भाजप मोठा भाऊ तर सेना लहान भावाच्या भूमिकेत आहे. खान्देशात तर गेल्या पंचवीस वर्षांपासून सेना लहान भावाची भूमिका वठवत आहे. परंतु, लहान भावाची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. २०१४ मध्ये युती तोडण्याची घोषणा भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी केली, तेव्हापासून सेनेच्या रडारवर खडसे आहेत. हे वैर २०१९ मध्ये सेनेच्या जिल्हाप्रमुखाने बंड करेपर्यंत टिकून राहिले आहे. परंतु, शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्या गिरीश महाजन यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. त्यांच्याच जिल्ह्यात सेनेची पुन्हा कोंडी होत आहे.
२०१४ पूर्वी आणि नंतर हे दोन प्रमुख कालखंड भाजप आणि शिवसेना युतीच्या इतिहासात नोंदवले गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. प्रमोद महाजन हे युतीचे दुवा होते. कमळाबाई म्हणून बाळासाहेब भाजपला ठणकवयाचे आणि भाजपच्या विरोधातही अनेकदा भूमिका घ्यायचे. अगदी प्रतिभाताई पाटील या राष्टÑपतीपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार असतानाही सेनेने मराठी या मुद्यावर त्यांना पाठिंबा दिला आणि भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. भाजप विस्तारला तसा त्याला स्वबळाचा साक्षात्कार झाला. २०१४ मध्ये अजमावलेले स्वबळ स्थिर सरकार देण्याइतपत न लाभल्याने दोन्ही पक्ष एकत्र आले. मुंबई महापालिका निवडणुकीत खडाखडी झाली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांचा सेना पक्षप्रमुखांशी सुसंवाद आणि समन्वय असल्याने कधी तुटेपर्यंत ताणले गेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती झाली. उध्दव ठाकरे यांनी तर गिरीश महाजन यांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक करीत महाजन आम्हाला द्या, असे म्हटले. परंतु, आता त्याच महाजन यांचे नेतृत्व असलेल्या खान्देशात भाजप-सेनेत तणाव वाढला आहे. आपल्या वाटयापेक्षा अधिक घेण्याची हाव भाजपला वाटू लागल्याचे दिसू लागल्याने सेना नेते आणि सैनिक संतप्त झाले आहेत.
रोहिणी खडसे यांच्याविरुध्द सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. तत्पूर्वी पाटील यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. शिंदखेड्यात जयकुमार रावल यांच्या विरोधात उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी बंडखोरी केली. सेनेने या दोघांवर अद्याप कारवाई केलेली नाही, हे भाजप आवर्जून लक्षात आणून देत आहे. अक्कलकुव्यात सेनेचे आमशा पाडवी यांच्याविरुध्द भाजपचे माजी मंत्री दिलवरसिंग पाडवी यांचे सुपूत्र व माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, चोपड्यात लता सोनवणे यांच्याविरुध्द भाजपचे जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे, जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द भाजपचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, पाचोऱ्यात किशोर पाटील यांच्याविरुध्द भाजपचे अमोल शिंदे, पारोळ्यात चिमणराव पाटील यांच्याविरुध्द भाजपचे गोविंद शिरोळे यांनी बंड केले. शिंदे यांच्यावर केवळ कारवाई झाली. धुळे शहर मतदारसंघात हिलाल माळी या सेना उमेदवाराविरुध्द राजवर्धन कदमबांडे उभे आहेत. भाजपचे महापौरपूत्र आणि पदाधिकारी त्यांना उघड समर्थन देत आहेत. याचा अर्थ सरळ आहे. २० पैकी १४ जागा भाजप लढवतोय, पण सेनेला दिलेल्या ६ जागांवरदेखील भाजपचा डोळा आहे. आठवडा शिल्लक असताना असा तणाव राहिला तर युतीला मोठा धक्का बसू शकतो.
युतीमधील बंडखोरीविषयी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळ्यात कठोर प्रतिक्रिया दिली. पाठीत खंजीर खुपसणाºयाची आम्ही औलाद नाही असे म्हणत भाजपला त्यांनी सूचक इशारा दिला. उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मित्र असूनही त्यांनी पंतप्रधानांच्या सभास्थळी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर मुख्यमंत्र्यांना भाषणात स्पष्ट करावे लागले की, पक्षचिन्हावर असलेले उमेदवार हे अधिकृत आहेत. कोणालाही आशीर्वाद नाही.

Web Title: Better an enemy than a deceitful friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.