Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:40 IST2025-11-07T11:37:32+5:302025-11-07T11:40:17+5:30
Manoj Jarange Patil on Murder Plot: मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे

Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
अंतरवाली सराटी (जालना): मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा २.५ कोटी रुपयांचा कट उघडकीस आल्यानंतर, आता या प्रकरणाला मोठा राजकीय वळण मिळाले आहे. जरांगे पाटील यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगताना, मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.
अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हत्येच्या कटाचा सूत्रधार 'एका मोठ्या व्यक्ती'चा उल्लेख करत थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. जरांगे पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम धक्कादायक आहे. जरांगे पाटील याबाबत म्हणाले, हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती, त्यापैकी ५० लाख रुपये देण्यात आले होते. बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए (कार्यकर्ता) आहे. त्याने दोन आरोपींपैकी एका आरोपीला त्याने परळीला नेले होते. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी झाल्टा फाटा येथे धनंजय मुंडे यांनी या आरोपींची भेट घेतली. 'आम्ही त्याला ठोकतो' असे आरोपींनी सांगितल्यावर, मुंडे यांनी 'मी जुनी गाडी देतो' असे आश्वासन दिले. "या घातपाताच्या कटाचे मूळ धनंजय मुंडे आहे.'' असा दावा जरांगे यांनी केला. तसेच खून करून राजकारणामध्ये माणूस मोठा होत नाही. हा प्रकार गंभीर आहे, सर्वांनी हुशार होणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
मी खमक्या होतो, म्हणून त्यांचा बाप ठरलो
मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "तुम्ही शांत राहा म्हणजे मला सुखाचे दिवस आणता येईल... हा नायनाट नक्की करू. आपण बेसावध असतो तर घटना घडून गेली असती, मी सतर्क होतो म्हणून मी त्यांचा बाप ठरलो," असे अत्यंत भावनिक आणि रोखठोक विधान त्यांनी केले.
सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
जरांगे पाटील यांनी केवळ मराठा नेत्यांनाच नव्हे, तर राज्यातील सर्व ओबीसी नेते आणि मुस्लिम नेत्यांनाही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याची विनंती केली. "विरोधात भाषण करणारा परवडला, पण जीव घेणारा नाही. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतल," असा इशारा देत त्यांनी 'यांचा नायनाट करणे गरजेचे आहे,' असे ठणकावून सांगितले. या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, आणि आता धनंजय मुंडे या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हत्येच्या कटात बीडच्या गेवराईमधून दोघे ताब्यात
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली. स्वत: जरांगे पाटील यांनीही बुधवारी मध्यरात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.