जालन्यात पाणीबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST2019-04-07T00:50:10+5:302019-04-07T00:50:38+5:30

गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला.

Water supply in Jalna | जालन्यात पाणीबळी

जालन्यात पाणीबळी

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाणीटंचाईने दिपालीचा बळी घेतला.
दिपाली, तिची लहान बहिण रूपाली या आई लंकाबाई शिंदे यांच्यासोबत गावालगत असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धुत असताना दिपाली विहिरीतून पाणी शेंदून देत होती. दरम्यान तोल जाऊन ती विहीरीत पडली. आई व बहिनीने आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु, डोक्याला मार लागून ती मृत पावली होती.
तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील गोकूळ या एक हजार ८०० लोकसंख्या असलेल्या गावासाठी दानापूर येथे विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, विहिरीतील पाणी संपल्याने सरपंच समाधान शेरकर यांनी गोकूळ गावासाठी बानेगाव येथून प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, तलाठी अभय कुलकर्णी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशी माहिती सरपंच शेरकर यांनी दिली.
पंधरा दिवसात तिघांचा मृत्यू
गोकूळ येथे पंधरा दिवसापूर्वी केळना नदीच्या पात्रात वाळू चा उपसा करीत असताना दोन तरूण मुलांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता. यात शनिवारी पुन्हा दिपालीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी गावात सर्वांनी गुढी उभारली होती. मात्र, या घटनेनंतर गावामध्ये कोणीही सण साजरा केला नाही.

Web Title: Water supply in Jalna