जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:27 IST2025-09-23T18:26:19+5:302025-09-23T18:27:30+5:30
दहा महसूल मंडळांत अतिवृष्टी : अनेकांच्या घरांत पाणी, संसार उघड्यावर, व्यापाऱ्यांनाही फटका

जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले
जालना : जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी पहाटेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. दहा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरी, ग्रामीण भागातील अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आला आहे. शिवाय दुकानांत पुन्हा पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. या पावसामुळे विरेगाव, हिवर्डी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २६ जणांची सुटका अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’च्या पथकाकडून करण्यात आली आहे.
जालना शहर मंडळात ७६.८ मिमी, सेवली- १११.८ मिमी, रामनगर- ७६.८ मिमी आणि पाचनवडगाव महसूल मंडळात ७६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना शहरासह तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरातील भाग्यनगर, गांधीनगर, सुंदरनगरसह इतर अनेक भागांतील घरांत पाणी पुन्हा शिरले होते. तर व्यापाऱ्यांच्या दुकानांतही पाणी शिरले होते. तर हिवर्डी गावच्या शिवारातील शेतात १४ लोकं अडकले होते. एकीकडून ओढा आणि दुसरीकडे नदी अशा स्थिती असलेल्या या सहा महिला व आठ पुरुषांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले. तर विरेगाव येथेही अशाच स्थितीत विरेगावमधून १२ जण अडकले होते. त्यांना ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले. या दोन्ही घटनास्थळांना आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देऊन आढावा घेतला; तसेच पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार छाया पवार व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
३० जनावरेही वाचविली
विरेगाव येथील शेतातील पाण्याच्या विळख्यात ३० जनावरेही अडकली होती. या ३० जनावरांना प्रशासकीय पथकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
खोतकर, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जालना शहरासह ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पाहणी करून आढावा घेतला. पूरग्रस्तांना मदत करीत धीर देण्याचे कामही केले. त्याशिवाय नुकसानीचे पंचनामे वेळेत करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या मंडळांत अतिवृष्टी
जालना शहर मंडळात ७६.८ मिमी, सेवली- १११.८ मिमी, रामनगर- ७६.८ मिमी आणि पाचनवडगाव महसूल मंडळात ७६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडळात ६८.३ मिमी, तर राेहिलागड मंडळात ६५.३ मिमी पाऊस झाला आहे. सुखापुरी महसूल मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. बदनापूर महसूल मंडळात ६५.८ मिमी, सेलगाव- ६५.८ मिमी आणि रोषणगाव महसूल मंडळात ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करा
सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. व्यापारीवर्गासह सर्वसामान्य, गोरगरिबांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी, व्यापाऱ्यांसह गोरगरीब नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी आ. अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे यांनी दिली.
आजवर झालेला पाऊस
तालुका- टक्केवारी
जालना- १२०
बदनापूर- १२७
भोकरदन- ११२
जाफराबाद- १२२
परतूर- १०७
मंठा- १०२
अंबड- १२८
घनसावंगी- १३१