'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:30 IST2025-09-25T20:28:02+5:302025-09-25T20:30:29+5:30
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान द्या; मागणी पूर्ण न झाल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): "सरकार म्हणतय कर्जमाफी योग्य वेळी करू, पण सरकारची योग्य वेळ कधी येणार?" असा संतप्त सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या 'PM केअर फंडा' तून २५ ते ५० हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा, अशी थेट मागणी त्यांनी केली.
नोटीस शिवसेना शाखेत जमा करा
गुरुवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर आणि मोसंबीसारख्या फळ पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले, ज्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. या संकटाच्या काळात आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहन करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, बँकांच्या ज्या नोटीस शेतकऱ्यांना येत आहेत, त्या सगळ्या एकत्र करून जवळच्या शिवसेना शाखेत जमा कराव्यात, यावर पुढे काय करायचे, ते आम्ही बघतो, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
'पंजाबच्या धर्तीवर ५० हजार अनुदान द्या'
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान दिल्याचे उदाहरण देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीही तेवढेच हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.
लाडक्या बहिणीचे संकट दूर होईल का?
ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'लाडक्या बहिणीला पैसे देतो' या विधानावरही टीका केली. "१५०० रुपये महिना देऊन लाडक्या बहिणीचे संकट दूर होईल का?" असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला.
'कर्जमाफी नाही केली तर रस्त्यावर उतरणार'
जर सरकारने थोड्या दिवसांत कर्जमाफी केली नाही, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांद लावून रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.