बाजार समित्या बंद करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय दुर्दैवी : आढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:54 IST2019-11-18T00:54:37+5:302019-11-18T00:54:37+5:30
शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

बाजार समित्या बंद करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय दुर्दैवी : आढाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बाजार समित्यांमुळे हमाल, मापाडींना रोजगार मिळतो. मात्र, केंद्र शासनाने बाजार समित्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.
जालना बाजार समिती सभागृहात रविवारी आयोजित हमाल मापाडी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियन चे संघटक प्रा. संजय लकडे, श्रमिक मुक्ती दलाचे साथी धनाजी गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजार समितीत कार्यरत मापाड्यांना घरी बसवणारा निर्णय महामंडळाने संघर्ष करून सरकारला बदलायला भाग पाडले. मात्र, आता बाजार समित्या बरखास्तीची टांगती तलवार उभी राहिल्याने, त्या विरुद्ध हमाल - मापाड्यांनी एकजूट करून, हे संकट परतून लावावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ओंकार अवचारमल, हसन खा नवाज खा, शेख उस्मान शेख गफूर, मोहन जगधने, वैजिनाथ भारती, भास्कर फंडे हमीद खान, मुखतार भाई यांच्यासह हमाल- मापाडी महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.