दुर्दैवी ! पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ शिक्षकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:00 IST2020-10-12T18:58:11+5:302020-10-12T19:00:58+5:30
The dead body of 'that' teacher was found in Jalana गावालगत असलेल्या ओढ्यातील पाण्यात रविवारी रात्री वाहून गेले होते

दुर्दैवी ! पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ शिक्षकाचा मृतदेह आढळला
परतूर (जि. जालना) : जोरदार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात रविवारी रात्री वाहून गेलेल्या शिक्षकाचामृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह आणि दुचाकी पाटोदा गाव परिसरात आढळून आला. आबासाहेब मुंजाजी पवार (३२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
आबासाहेब पवार हे पाटोदा माव येथील रहिवासी असून, ते येनोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत होते. रविवारी कामानिमित्त ते परतूर गेले होते. रात्री पवार पाटोदा माव गावाकडे येत होते. दरम्यान वादळी पाऊस झाल्याने दैठणा नदीला पूर आला होता. खबरदारी म्हणून ते पांडेपोखरी मार्गे कुंभार पिंपळगावकडून पाटोदा येथे जात होते. यावेळी गावालगत असलेल्या ओढ्यातील पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने ते दुचाकीसह वाहून गेले.
सोमवारी सकाळी ग्रामस्थांना गावानजीक आबासाहेब पवार यांचा मृतदेह व दुचाकी आढळून आली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत आबासाहेब यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, असा परिवार आहे.
दोघांचे वाचले प्राण
लोणार व गेवराई येथील दोन दुचाकीस्वार रविवारी रात्री आपल्या गावाकडे जात होते. यावेळी पाटोदा गाव परिसरातील फरशी पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात दुचाकी घातल्या. परंतु, पाण्याचा वेग अधिक असल्याचे लक्षात येताच त्यांनी दुचाकीवरून उड्या मारून प्राण वाचविले. सदरील दोनही दुचाकी सोमवारी सकाळी ओढ्याच्या पात्रात आढळून आल्या.